धुळ्यात भाड्याने घेतलेल्या गाड्या विकणारी टोळी गजाआड, धुळे तालुका पोलिसांची कारवाई
धुळे तालुका पोलिसांनी भाड्याने वाहने घेऊन ती परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तक्रारदार अभिषेक पाटील रा. नांदगाव, जि. नाशिक यांनी सोशल मीडियावर महिंद्रा थार विक्रीस असल्याचे पाहून संपर्क साधला. आरोपींनी ३ लाख रुपये घेत गाडी दिली, मात्र नंतर खरी मालकी सांगत काही इसम ती घेऊन गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तक्रारदाराने हुशारीने नवीन नावाने पुन्हा आरोपींशी संपर्क साधून गाडी खरेदीस तयार असल्याचे सांगितले. ७ फेब्रुवारी रोजी शिरुड चौफुली येथे आरोपी आले असता, नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
