Anna Hazare talk on Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पराभूत झाली आहे. अरविंद केजरीवाल यांचा पक्षाच्या धोरणांमुळे पराभव झाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया देताना नेमका पराभव कशामुळे झाला? याबबत अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.
भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून बाजूला होत राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर केजरीवाल आणि हजारे यांच्यात अंतर पडत गेले. दिल्लीत केजरीवाल यांचे पहिल्यांदा सरकार आले, तेव्हा हजारे यांनी कौतूक केले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यात बिनसले. तेव्हापासून हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर सातत्याने टीका केली. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाही हजारे यांनी केजरीवाल यांच्या दारू धोरणावर टीका करीत आम आदमी पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन अप्रत्यक्षपणे दिल्लीच्या मतदारांना केले होते.
अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होते, तेव्हा त्यांची नियत साफ होती. एक चांगला कार्यकर्ता आहे, असे समजून मी सोबत घेतले होते. मात्र पुढे जाऊन त्यांनी पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्यांची साथ सोडली. राजकारणात गेल्यावर सुरुवातीला चांगली कामे केली मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. केजरीवाल यांना विचार, चारित्र्य शुद्ध ठेवणे आवश्यक असल्याचे मी अनेकदा सांगत होतो. त्यांनी ऐकले नाही. दारूच्या दुकानांसाठी त्यांनी आणलेले धोरण आणि त्यात झालेले गैरप्रकार दिल्लीच्या मतदारांना आवडले नाहीत. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असं हजारे म्हणाले.
केजरीवाल यांच्यावर दिल्लीच्या मतदारांचा विश्वास राहिला नाही. त्यांचे सरकार आपल्यासाठी काही करेल, यावरचा विश्वास उडाला होता. दारूसंबंधीचे त्यांचे धोरण लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे त्यांना नाकारले. आता यापुढे आम आदमी पार्टीची सत्ता कधी कोठे येईल का? हे सांगणे कठीण आहे, असंही हजारे म्हणाले.

