• Fri. Mar 13th, 2026

    शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक, साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

    शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक, साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

    शिर्डीत साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येची घटना घडली. यानंतर शिर्डी साईबाबा संस्थानकडून भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना प्रसादासाठी आता टोकन बंधनकारक असणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यानगर : शिर्डीत साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानने मोफत अन्नछत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता भोजनासाठी टोकन घेणं बंधनकारक असणार आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी संस्थानने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी याआधीच मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, असा दावा केला होता. त्यानंतर आता शिर्डी संस्थानने मोफत भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    शिर्डी संस्थानने काय म्हटलं?

    “साईभक्तांना गेटवर कुपन देवून प्रसाद दिला जायचा. यामध्ये आता बदल केला आहे. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतं त्याच ठिकाणी प्रसादाचं आणि नाष्ट्याचं कुपन दिलं जाईल. येणारा कोणताही साईभक्त उपाशी राहणार नाही. त्याची प्रसादाची व्यवस्था साईबाबा संस्थानकडून केलेली आहे”, अशी माहिती साई संस्थानकडून देण्यात आली आहे.

    शिर्डीत नेमकी काय घटना घडली?

    शिर्डीत दोन दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली. दोन आरोपींनी दारुच्या नशेत लुटमार करण्याच्या हेतूने साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या केली. तर आणखी एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. संस्थानमध्ये कामासाठी येणारे सुभाष घोडे, तर ड्युटीवरुन घरी जाणारे नितीन शेजूर यांची आरोपींनी हत्या केली. तर कृष्णा देहरकर यांना जखमी केलं. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आता साईबाबा संस्थानकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
    दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनाच कोर्टाचे सवाल

    सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

    “हे जे दोन लोकं सीसीटीव्हीत दिसत आहेत, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे, परत एकदा तोच मुद्दा समोर आला आहे, जे मी बोललो होतो. शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आजचा असा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते आता कदाचित महाराष्ट्राला समजलं असेल. पण यात राजकारण नको. घडलं ते दुर्दैवी आहे”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed