• Fri. Jul 10th, 2026

    बुडीत बंधारा बांधकामामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल -मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2025
    बुडीत बंधारा बांधकामामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल -मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

    मुंबई दि. ०४: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामास विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

    मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले, कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येत आहेत. जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

    मृद व जलसंधारण विभागामार्फत कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्यात येणार आहेत.  या बंधाऱ्यांमुळे आवश्यक पाणी साठा होऊन या भागात पिण्यास व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. या कामास मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याने या भागातील नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले.

    २५ बंधारा बांधकामाच्या कामास १७० कोटीची तरतूद

    महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये बुडीत बंधारा आकल्पे, आहिरे, फुरुस, हरचंदी, कळम गाव, लामज, कोट्रोशी, म्हावशी, मुनावळे, निवळी क्र. १, निवळी क्र. २, पाली तर्फ आटेगाव, पिंपरी तर्फ तांब, रेनोशी, उचाट, वाळणे, आवळण,  दरे तर्फ तांब क्र १, दरे तर्फ तांब क्र. २, आणि जावळी तालुक्यातील आमशी, गावढोशी, केळघर तर्फ सोळशी,  तेटली, शेंबडी आणि  वेंगळे या बुडीत बंधाऱ्याच्या समावेश आहे.

    ०००

    एकनाथ पोवार/विसंअ/

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed