Fda Tukaram Mundhe Raid : महाराष्ट्रात FDAने अवघ्या तीन दिवसांत पाच शहरांत मोठी कारवाई केली. पाकिस्तानी ब्युटी क्रीम, बिनपरवान्याची आयुर्वेदिक औषधं, दिशाभूल करणारे दावे आणि हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीमागचं धक्कादायक चित्र या मोहिमेत समोर आलं.
या मोहिमेतील सर्वाधिक मोठी कारवाई नांदेडमध्ये झाली आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकल्यानंतर ‘अफराह कलेक्शन’ या दुकानात पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या ब्युटी क्रीमचा मोठा साठा आढळला. ‘गोरी’सह विविध ब्रँडची ही सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. संबंधित व्यापाऱ्याकडे खरेदीची वैध कागदपत्रे नसल्याने जवळपास ३९.७० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे कारवाई
पुण्यातील शुक्रवार पेठेतूनही आणखी धक्कादायक प्रकार समोर आला. कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर भस्म आणि रस औषधांचे उत्पादन व विक्री सुरू असल्याची माहिती FDAला मिळाली होती. छापा टाकल्यानंतर औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादकाचे नाव, मुदत अशा अनिवार्य नोंदीच नसल्याचे आढळले. मालकीची कागदपत्रेही सादर करता आली नाहीत. त्यामुळे ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
Devendra Fadanvis : राज ठाकरेंचा हिंदीवरुन सवाल, सीएम फडणवीसांचं दोन संस्कृत शब्दांत उत्तर; विधानसभेत एकच हशा
बीड कारवाई
बीडमध्ये ‘मेरा रूप श्रृंगार क्रीम’ या उत्पादनावर त्वचा उजळणे, डाग कमी होणे अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळल्या. संबंधित उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर कारवाई
सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र कारवाईचा केंद्रबिंदू ठरले हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्स. सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमध्ये रुग्णांना तेथूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार खरी ठरली. तपासात प्रिस्क्रिप्शन न देणे, नियमबाह्य औषधविक्री, एक्सपायरी औषधांची अयोग्य साठवण यांसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने स्टोअरला स्टॉप अॅक्टिव्हिटीचे आदेश देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधील एका कर्करोगाच्या रुग्णाला केमोथेरपीसाठी आवश्यक इंजेक्शन बाहेरून खरेदी करण्यास मज्जाव केल्याचा प्रकारही समोर आला. त्यानंतर झालेल्या तपासणीत मेडिकल स्टोअरमध्ये अनेक गंभीर नियमभंग आढळल्याने संबंधित विक्री परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर अशा प्रकारच्या बिनपरवान्याच्या, बनावट किंवा दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या औषधे व सौंदर्यप्रसाधनांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. संशयास्पद उत्पादनांची माहिती नागरिकांनी जवळच्या FDA कार्यालयात देण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
