Eknath Shinde: खरं बोलण्याची हिंमत दाखवली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय, विश्वासू शिलेदाराचं कौतुक केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सत्तेत असताना ‘दाम’ दिसतो आणि सत्ता गेल्यानंतर त्यांना ‘राम’ आठवतो, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. त्यांना मिळाली कर्माची शिक्षा, म्हणून आठवली राम रक्षा असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना रामदास आठवले स्टाईल टोला लगावला. विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या राम रक्षा आंदोलनाचा त्यांनी समाचार घेतला.
मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली. यावरुन शिंदेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. मिसिंग लिंकवरुन टीका करणाऱ्या विरोधकांनी कमान कोसळली की रस्ता कोसळला, याची तरी खातरजमा करायला हवी होती, असा चिमटा शिंदे यांनी काढला. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांचं जाहीर कौतुक केलं. मिलिंद नार्वेकर यांनी मिसिंग लिंकबद्दल खरं बोलण्याची हिंमत दाखवली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे विधिमंडळात म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच विधिमंडळात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याबद्दल शिवसेना उबाठाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावरूनही शिंदेंनी ठाकरेसेनेला लक्ष्य केलं. ‘विधिमंडळात सीमा प्रश्नावर बैठक होती. त्या बैठकीला शरद पवार आले होते. विधिमंडळातून जाता जाता ते माझ्या दालनात आले होते. त्यांना त्यांच्या नेत्य्यांशी चर्चा करायची होती. तिथे जागा नसल्यामुळे ते माझ्या दालनात आले. मी तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. ते माझ्या दालनात आल्याचं मला समजलं. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते आल्याचं समजताच मी तातडीनं दालनात गेलो. त्याचं स्वागत केलं. यावरुन काही जणांना मिरच्या झोंबल्या. किती ती मळमळ, किती ती जळजळ? हे काय आहे?’ असं म्हणत शिंदेंनी ठाकरेसेनेला लक्ष्य केलं.
शरद पवारांसोबतच्या बैठकीवरुन काही जण वेगळा विचार करत आहेत. ते स्वत:ची फसगत करत आहेत. शरद पवार ज्येष्ठ आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार केला. यानंतर काहींनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. तुमच्या जितके खालच्या थराला जाऊन बोलाल, टीका कराल, तितकेच आणखी गाळात जाल, असं शिंदे यांनी सुनावलं.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा