Balaji Kalyankar attack on BJP Ashok Chavan : निवडणुकीच्या काळात भाजपबाबत मौन धारण केलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अखेर मौन सोडले आहे. ‘विधानसभा निवडणुकीत महायुतीत काय त्रास झाला हे सगळ्यांना माहित आहे . भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. असा आरोप कल्याणकरांनी केला आहे.
६ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. नवीन मोंढा येथे त्यांची आभार सभा पार पडणार आहे. या अनुषंगाने आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान कल्याणकर यांनी भाजप नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.
बालाजी कल्याणकर म्हणाले, मला ५० हजारांची लीड मिळणे अपेक्षित होते. पण मला नांदेड उत्तर मधून केवळ साडेतीन हजारांची लीड मिळाली. त्यामुळे माझा निसटता विजय झाल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली. तर पुढे ते म्हणाले की, ‘मतदारसंघात माझं काम चांगलं असल्याने मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो आहे. महायुती म्हणून भाजपने सहकार्य करणे आवश्यक होते, परंतु तसे विधानसभा निवडणुकीत झाले नाही. भाजपच्या नवीन लोकांनी माझ्याविरोधात पैसे वाटप केले.’
शिंदे-ठाकरे एक होणार? संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
आम्हाला महायुतीचा धर्म पाळायचा आहे. भविष्यात एकत्र काम करायचं आहे, हे त्यांना पण समजायला पाहिजे होतं. जर भाजपवाले युतीधर्म पाळत नसतील तर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत कळवणार असल्याचे आमदार कल्याणकर यांनी नमूद केले. दरम्यान, आमदार बालाजी कल्याणकर यांचा रोख अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांवर होता. त्यांच्या या आरोपानंतर नांदेडमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे.
आमदार हेमंत पाटील यांचा अशोक चव्हाण यांना इशारा
नांदेड जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यामुळे भाजपा नांदेड जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वतंत्र लढेल असे जवळपास स्पष्ट दिसत आहे. यावर आमदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता जश्यास तसे उत्तर दिले जाईल असे हेमंत पाटील म्हणाले. जिल्ह्यात आमचे चार आमदार असून आमचीही ताकद वाढली आहे. स्वतंत्र निवडनुक लढायच्या होत्या तर विधानासभा निवडणूकाही स्वतंत्र्य लढायच्या होत्या असे पाटील म्हणाले. मित्रांचे पाय ओढायचे नसतात, नाहीतर मला न तुला घाल कुत्र्याला होईल असेही हेमंत पाटील म्हणाले.

