• Thu. Jan 23rd, 2025

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 23, 2025
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद




    मुंबई, दि. 23 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    मंत्रालयात  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, दूरदृश्यप्रणालीव्दारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर,अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, कोकण विभागाचे उपसंचालक हणमंत हेडे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने अनेक पर्यटन प्रकल्प सुरू आहेत. पर्यटनाच्या उपलब्ध असलेल्या विविध योजना व सवलती याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करून सर्व पर्यटन योजनांना गती देण्यात येईल. जिल्ह्यात होणाऱ्या ताज प्रकल्पासाठी पर्यावरणासह आवश्यक त्या परवानग्या घेऊन स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करा. चांदा ते बांदा प्रकल्पातील मंजूर कामांसाठी वर्ग करण्यात आलेल्या निधीची कामे गतीने करा. सिंधुरत्न योजना, जिल्ह्यात सुरू होणारी सबमरीन, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील वॉटर स्पोर्टस या कामांना विभागाने गती द्यावी, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी केल्या.

    यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

    ००००

    संध्या गरवारे/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed