नवी दिल्ली, दि. 23 : रंगमंचाच्या चाहत्यांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) च्यावतीने भारत रंग महोत्सवाचे आयोजन 28 जानेवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये मराठीतील तीन नाटके सादर होणार आहेत.
जगातील सर्वांत मोठा रंगमंच महोत्सव म्हणून ओळखला जाणारा भारत रंग महोत्सव (भारंगम) यंदा २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या २५ व्या आवृत्तीत भारतासह नेपाळ, श्रीलंका आणि देशातील १३ शहरांमध्ये हा रंगोत्सव आयोजित केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व एनएसडीचे माजी विद्यार्थी राजपाल यादव यांची “रंगदूत” (महोत्सव राजदूत) म्हणून निवड करण्यात आली आहे. २० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नऊ देशांतील २००हून अधिक अनोख्या सादरीकरणांचा समावेश असेल.
८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘गोष्ट संयुक्त मानपानाची’ हे नाटक अभिराम भडकमकर लिखित व हृषीकेश जोशी दिग्दर्शित आहे. नाट्य संपदा कलामंच आणि शौर्य प्रोडक्शन्स, मुंबई या समूहांद्वारे या नाटकाची मांडणी केली जाईल.
९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे “कलगीतुरा” हे नाटक दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित आहे. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई या समूहाने याची निर्मिती केली आहे.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘38 कृष्णा व्हिला’ हे नाटक श्वेता पेंडसे लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित आहे. १२० मिनिटांचे हे नाटक रॉयल थिएटर, मुंबई या समूहाद्वारे सादर होईल. तीनही नाटके मंडी हाउस जवळ असणाऱ्या श्रीराम सेंटर सभागृहात सादर केली जाणार आहेत.
0000
अंजु निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.14 /दि. 23.01.2025