Vasai Crime News : वसईतील नायगाव पूर्वेतील बापाणे मध्ये गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नायगाव पूर्व परिसरात असलेल्या बापाणे येथील मौजे चंद्रपाडा सर्वे नं १६७ व १६८ या जमिनीबाबत भोईर कुटुंब आणि हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद झाला. यामधून मारहाणीची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात भोईर परिवारातील सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुधवारी याच जमिनीच्या ठिकाणी ई-साक्ष पंचनामा सुरू असताना दोन्ही गट एकमेकांसमोर आले व पुन्हा या दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली.
Jalgaon Crime : मुलगी लागत होती, तर माझा हिरा का हिरावून घेतला? जळगावात ‘सैराट’ हत्या, मयत तरुणाच्या पत्नीचा टाहो
पुढे दोन गटातील वाद इतका विकोपाला गेला की, मेघराज भोईर याने स्वतःकडे असलेल्या बंदुकीने गोळ्या झाडल्या. मेघराजने बंदुकीतून तीन फेऱ्या झाडल्या यात तीनजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मेघराजने स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचा दावा करण्यात येत आहे. हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, वैकुंठ पांडे अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, राजन सिंग हे तीन जण मारहाणीमुळे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेची पथके, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर नायगाव पोलीस ठाणे येथे परिस्थितीचा आढावा देखील घेतला. गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर याच्यासह सहा जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. तर प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.