• Wed. Jan 22nd, 2025

    नागपूर शहरातील पायाभूत सुविधांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 22, 2025
    नागपूर शहरातील पायाभूत सुविधांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद




    मुंबई, दि. २२ :  नागपूर  शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. विकासकामे जलद गतीने पूर्ण करुन नागरिकांना  दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी  संबधित यंत्रणांनी या कामांचे सुयोग्य नियोजन करावे, अशा  सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

    नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालिका यांचेकडील प्रलंबित प्रकरणांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीस नगरविकास विभाग १ चे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता,नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मीना, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त  अभिजित चौधरी उपस्थित होते.

    महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांची कामे ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या कामांचा  थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि विकासाच्या गतीवर होतो.  त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत. पायाभूत सुविधांची  कामे मार्गी लावण्यासाठी  निधीची कमतरता असल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव तात्काळ पाठवून द्यावेत. नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व अनुषंगिक कामांबाबत पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश श्री.बावनकुळे यांनी दिले.

    या बैठकीत नागपूर महापालिकेकडील प्रलंबित कामे, त्यांना आवश्यक असणारा निधी व प्रशासकीय मान्यता, स्मार्ट सिटीमधील कामाबाबत आढावा घेण्यात आला. नागपूर महापालिकेकडील कामांसाठी  आवश्यक मंजूरी देण्याबाबतची  नगरविकास विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी  दिल्या.

    ००००

    एकनाथ पोवार/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed