मुंबई,दि.२२ केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. सन 2021-22 पासून राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियाचा शुभारंभ आणि दशकपूर्ती सोहळा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ हे अभियान सुरू झाले. या उपक्रमामुळे मागील दहा वर्षात मुलींचा जन्मदर वाढला आहे. मुलींच्या प्राथमिक शिक्षणाचा टक्का हा ८७ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून मुलगा – मुलगी भेदभाव करू नये. मुलींना शिकवल्यास त्या कुटुंबाचा आधार होतात. या शिकवणीसह घरातील मुलांना मुलींप्रती चांगली शिकवण, संस्कार देणे गरजेचे आहे. मुलींमध्ये कर्तृत्ववान स्त्री असल्याचा आत्मविश्वास निर्माण करा. असे सांगून हे अभियान दि. 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विशेष उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या अनेक योजना आणल्या. या योजनांमुळे महिला स्वावलंबी झाल्या.
राज्य शासनाने मुलींना शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महिलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. महिला लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊ, सावित्री बाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचा आहे असे सांगून मुलींचा जन्मदर आणि शिक्षण यासाठी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवावेत त्यामुळे लोकांचे मनपरिवर्तन होण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, विभागीय उपायुक्त, कोकण विभाग, सुवर्णा पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खेळाडू महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच , महिला बचत गटांना धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
000
काशीबाई थोरात/विसंअ