• Wed. Jan 22nd, 2025

    सेनेचे ३ आमदार पाडायला फिल्डींग लावली! शिंदेंच्या शिलेदाराचे दादांच्या विश्वासू नेत्यावर आरोप

    सेनेचे ३ आमदार पाडायला फिल्डींग लावली! शिंदेंच्या शिलेदाराचे दादांच्या विश्वासू नेत्यावर आरोप

    महायुतीमधील कुरबुरी काही केल्या संपताना दिसत नाहीएत. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदांवरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक, रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    रायगड: महायुतीमधील कुरबुरी काही केल्या संपताना दिसत नाहीएत. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदांवरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक, रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे. रायगडचे शिवसेनेचे ३ आमदार असताना अवघा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रिपद कसं काय दिलं, असा सवाल शिवसैनिकांकडून विचारला जात आहे.

    रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना देण्यात आलं आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकमंत्रिपद सेनेच्या भरत गोगावलेंना मिळावं अशी शिवसैनिकांसह जिल्ह्यातील सेनेच्या अन्य आमदारांचीदेखील मागणी आहे. रायगडमधील शिवसैनिक आज मुंबईत आले होते. त्यांनी मुक्तागिरी बंगला गाठत गोगावलेंसमोर आपल्या भावना मांडल्या. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शिवसैनिक रायगडहून आले होते.
    शिंदेंचे ‘ते’ ३ निर्णय फडणवीसांनी फिरवले अन् संबंध बिघडले; नाराजी नाट्यामागची इनसाईड स्टोरी
    पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्यानं रायगडमधील शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळले. त्यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे खासदार आणि अदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेंनी आम्ही सुसंस्कृत आहोत असं म्हणत गोगावलेंसह शिवसेना आमदारांना टोला लगावला. त्याचा समाचार गोगावलेंनी आज घेतला. तटकरेंनी जरा अंतरंगात डोकावून पाहावं. मग त्यांना ते किती सुसंस्कृत आहेत या प्रश्नाचं उत्तर मिळेल, असा खोचक टोला गोगावलेंनी लगावला.

    ‘लोकसभा निवडणुकीत तटकरेंनी आमच्याकडे मदत मागितली होती. आम्ही त्यांना तन, मन, धनानं साथ दिली. राष्ट्रवादीला राज्यात केवळ एक जागा जिंकता आली. आम्ही रायगडचा किल्ला राखला. त्यावेळी महेंद्र दळवी, रवीशेठ पाटील, योगेश कदम यांच्यासह मीदेखील तटकरेंचं काम प्रामाणिकपणे केलं,’ याची आठवण गोगावलेंनी करुन दिली.
    दादांनी स्वत:पुरतं, तटकरेंनी लेकीपुरतं पाहिलं! NCPमध्ये मोठी खदखद; मंत्री नाराज, कारण काय?
    ‘लोकसभेला आम्ही तटकरेंना सहकार्य केलं. पण विधानसभेला त्यांनी आमच्याविरोधात फिल्डींग लावली. प्रत्येक मतदारसंघात त्यांची वेगळी गणितं होती. महेंद्र थोरवेंच्या कर्जत मतदारसंघात वेगळी तडतोड होती. तिथे थोरवेला पाडा. आम्हाला मदत करा, अशी भूमिका होती. अलिबागमध्ये महेंद्र दळवीला आम्ही पाडतो आणि तुम्हाला मदत करतो, अशी तडजोड होती. मलाही पाडण्याचा डाव होता. कारण मी पालकमंत्री होण्याची शक्यता होती,’ असं म्हणत गोगावलेंनी तटकरेंवर गंभीर आरोप केले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed