• Wed. Jan 22nd, 2025

    स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 21, 2025
    स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद




    मुंबई, दि. 21 : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

    आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, राज्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, सहसंचालक श्रीमती कमलापुरे आदींसह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

    आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत  पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री श्री.अबिटकर म्हणाले, नाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

    जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी. या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

    ००००

    निलेश तायडे/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed