मुंबई, दि. २२ : भारतीय टपाल विभागाने आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीमध्ये मानवी संवेदनेसह सेवा देऊन लोकांशी भावनिक नाते जोपासले आहे. हे भावनिक नाते व विश्वासाची परंपरा हे डाक विभागाचे बलस्थान असून, आगामी काळात डाक विभाग विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे (महापेक्स २०२५) उदघाटन राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे मुले व युवा वर्ग अंकगणना आणि लेखन कौशल्य विसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व युवकांना पत्रलेखन, तिकीट संकलन आदी विषयांची गोडी लावण्याचा डाक विभागाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी सचित्र विरूपण प्रकाशित करण्यात आले, तसेच मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते महापेक्सच्या बोधचिन्हाचे उदघाटन करण्यात आले तसेच जागतिक व्यापार केंद्र मुंबई, ब्रेल लिपी तसेच डाक सेवा इ सायकल अभियानावर आधारित विशेष आवरणाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र व गोव्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, जागतिक व्यापार केंद्र मुंबईचे संचालक विजय कलंत्री, टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉय, मानेक शाह, काही देशांचे वाणिज्यदूत व देशाच्या विविध भागातून आलेले पोस्ट तिकीट संग्राहक उपस्थित होते. महापेक्स हे प्रदर्शन ४ दिवस सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*****
Maha Governor inaugurates State Philatelic Exhibition
Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 4 – day MAHAPEX 2025 the State Level Philatelic Exhibition organised by the Maharashtra Postal Circle at World Trade Centre in Mumbai on Wed (22 Jan.)
The Governor released the Logo of the Exhibition and also released the Permanent Pictorial Cancellation on Pandav Leni near Nashik and Customised My Stamp on Mulchand G Shah.
The Governor also released the Special Cover on the World Trade Centre Mumbai, Braille Script and the Dak Seva e-bicycle expedition on the occasion.
Chief Post Master General of Maharashtra and Goa Amitabh Singh, Chairman of WTC Mumbai Vijay Kalantri, Times of India Executive Bhavana Roy and Manek Shah were present.
0000