• Wed. Jan 22nd, 2025

    जिल्हा विकास आराखड्यात भविष्यातील गरजा व विकासाच्या संधीनुरुप नियोजन करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 22, 2025
    जिल्हा विकास आराखड्यात भविष्यातील गरजा व विकासाच्या संधीनुरुप नियोजन करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक – महासंवाद

    कुशल मनुष्यबळासाठी विविध संस्थांशी करार आवश्यक

    लिलावात गेलेले खाणपट्टे त्वरीत कार्यान्वित करा; जिल्ह्यातील शक्तीस्थळांचे प्रतिबिंब योजनेत दिसावे

    नागपूर,दि. 22 : प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराविक शक्तीस्थळे आहेत. यात नैसर्गिक साधनसंपत्तीसह औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने, पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने, कृषी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाच्या दृष्टीने एक समृद्ध वारसा आपल्याकडे आहे. जिल्ह्यातील नेमक्या शक्तीस्थळांना ओळखून समग्र विकासासाठी कोणते नियोजन अधिक हितकारक ठरेल त्यादृष्टीने भविष्यातील विकास आराखड्याचे नियोजन करा, असे सक्त निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

    विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्हा विकास आराखडा व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. याचबरोबर विदर्भातील इतर जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

    कोणत्याही विकास कामांना एक कालमर्यादा असते. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण झाली तरच त्यातील उपयोगिता हाती लागते. नियोजनाप्रमाणे वेळेत काम पूर्ण करतांना त्यात गुणवत्ता असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मिहान अंतर्गत अनेक विकास प्रकल्प राबविले जात आहेत. अनेक प्रकारच्या नवीन इंडस्ट्रीज येथे येत आहेत. कंपन्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच कसे उपलब्ध होईल यासाठी विविध शिक्षणसंस्थांसमवेत करार करुन नवे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या इंस्टीटयुट आकारास येतील अशी दूरदृष्टी आपल्या नियोजनात असली पाहिजे. याचबरोबर विविध उद्योजकांना प्रशासनातर्फे तत्काळ सहकार्य झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    नागपूर हे मेडिकल हब म्हणून नावारुपास आले आहे. त्यादृष्टीने संबंधित देशांच्या दुतावास कार्यालयाशी संपर्क साधून तसे स्वतंत्र एमओयु (संयुक्त करार) तत्काळ पुढाकार घेऊन करण्यास त्यांनी सांगितले.

    या बैठकीत त्यांनी शहरातील स्वच्छता व सुशोभिकरणाकडे लक्ष वेधले. विविध स्मारक, पर्यटन स्थळ, बसस्टॉप, मेट्रो स्टेशन येथील स्वच्छता ही आपल्या दूरदृष्टीत, नियोजनात असायलाच हवी. अनेक ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना बसण्याची सोय नसते, सावलीच्या जागा लोक शोधत असतात. आपण जेवढ्या चांगल्या सुविधा देऊ तेवढ्या प्रमाणात पर्यटक वाढतील. यातून रोजगार वाढेल हे लक्ष्यात ठेऊन नियोजनावर भर द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत खनिकर्म विभागाचा आढावा त्यांनी घेतला.

    विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सादरीकरणाद्वारे नागपूर जिल्ह्याचा प्रस्तावित विकास आराखडा सादर केला. यात कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, सेवा क्षेत्र, कौशल्य विकास, रियल इस्टेट, महामेट्रो, एमएमआरडीए, औद्योगिक विकास, सौर ऊर्जा प्रकल्प, मेडिकल हब, नवीन येणारे उद्योग आदीबाबत सविस्तर एक वर्षाचा कृती आराखडा त्यांनी आपल्या सादरीकरणाद्वारे बैठकीत मांडला.

    लिलावात गेलेले खाणपट्टे त्वरीत कार्यान्वित करा

    मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज राज्यातील खनिकर्म विभागाचा आढावा घेतला. राज्य खनिकर्म महामंडळाच्या बळकटीकरणासाठी गडचिरोली येथील लोह खनिजाचे तीन खाणपट्टे महामंडळाकडे असावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाबाबत त्यांनी माहिती घेतली. खनिकर्म विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल यांना याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मार्च 2025 पर्यंत 19 खनिजपट्टयातील लिलाव कार्यान्वित होतील, असे इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.  राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत ते त्वरीत सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे, असे स्पष्ट आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.   या बैठकीस खनिकर्म विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. याचबरोबर भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे महासंचालक डॉ. टी.आर. के. राव, उपसंचालक श्रीराम कडू,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड हे बैठकीत उपस्थित होते.

    गोरेवाडा प्राणी संग्रहालयास मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची भेट

    राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास भेट दिली. यावेळी त्यांनी प्राणीसंग्रहालयाची पाहणी केली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली कामे तसेच नियोजित कामांविषयीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट देत पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौर, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाला, मुख्य महाव्यवस्थापक टी. ब्युला, संचालक (प्राणी संग्रहालय) शतानिक भागवत, सहाय्यक व्यवस्थापक सारिका खोत यांच्यासह वन विभागाचे स्थानिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed