• Sat. Jan 18th, 2025
    पोलिसांची मोठी कामगिरी! पाच ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपी अखेर जेरबंद, २३ लाखांच्या मुद्देमालासहित मध्यप्रदेशातून धरपकड

    Crime News : नंदुरबार पोलीस मुख्यालयाजवळील वसाहतीत चोरट्यांनी दि.२९ रोजीच्या रात्री चार घरे फोडत सुमारे चार लाख २ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपासाला गती देण्यात आली होती. त्यानुसार दि.८ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सदर गुन्हा मध्यप्रदेश राज्यातील संशयितांनी केल्याचे समजले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील पोलिस वसाहतीमधील घरफोडीसह, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील, आंतरराज्यीय टोळीतील पाच संशयितांना एलसीबीच्या पथकाने मध्यप्रदेश राज्यातून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २३ लाख ३४ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी चार गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता दि.२० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    नंदुरबार पोलीस मुख्यालयाजवळील वसाहतीत चोरट्यांनी दि.२९ रोजीच्या रात्री चार घरे फोडत सुमारे चार लाख २ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपासाला गती देण्यात आली होती. त्यानुसार दि.८ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सदर गुन्हा मध्यप्रदेश राज्यातील संशयितांनी केल्याचे समजले.

    त्यानुसार मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आलेल्या पथकाने सबत प्यारसिंग अनारे (वय २९ वर्षे) रा.थिलवाणी, पोस्टे पिंप्रापाणी, ता.कुक्षी जि.धार, मध्यप्रदेश, मनसिंग सदनसिंग चव्हाण (वय २१ वर्षे ) रा.कुतेडी, पोस्टे नरवाली,ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी त्यांचा साथीदार फुलसिंग हरसिंग मंडलोई, रा. सिंगाचोरी (ता.कुक्षी, जि.धार,मध्यप्रदेश) हा चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी कुक्षी येथे येणार असल्याचे समजले.

    पोलिसांनी सापळा रचून फुलसिंग हरसिंग मंडलोई (वय २३) याच्यासह राजललीत सोनी (वय ३० वर्षे ) रा.जोबट,जि.अलिराजपुर, मध्यप्रदेश व हार्दिक कुमार जसवंत भाई सोनी (वय ३२ वर्षे ) रा.गरबडा, ता.गरबडा, जि.दाहोद, गुजरात यांना ताब्यात घेतले. संशयितांनी नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे चोरी केल्याचे सांगितले.
    संशयितांकडून २३ लाख ३४ हजार ३१० रुपयांचे दागिने व रोकड हस्तगत करण्यात आली.

    संशयितांनी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यात सुध्दा घरफोडी केल्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोहेकॉ.मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोना.मोहन ढमढेरे, पोशि.अभय राजपुत, विजय धिवरे यांच्या पथकाने केली आहे.

    महेश पाटील

    लेखकाबद्दलमहेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये नंदुरबार प्रतिनिधी म्हणून कार्यरत. 2003 ते 2014 दरम्यान विविध वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून सुरुवात. त्यानंतर विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून प्रवास करीत मटा ऑनलाईन पर्यंत वाटचाल.राजकीय बातम्यांमध्ये विशेष हातखंडा, विशेष स्टोरी शोधण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed