walmik karad Call Recording : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात वेग वाढला असून वाल्मिक कराडने मोबाईलवरून दिलेल्या खंडणीसाठीचे रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. आवाजाची तपासणी सुरू आहे आणि व्हाइस सॅम्पल घेतले जात आहेत. सीआयडीने कराडसह अनेकांची चौकशी सुरू केली आहे.
खंडणीच्या फिर्यादीत काय म्हटलंय?
२९ नोव्हेंबर रोजी सुनील शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत, असे सांगितले. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा’, असे म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी घुले कार्यालयात आला. ‘काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू’, अशी धमकी दिली. ‘काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या’, असे सांगितले होते. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे याचाच आहे का? यासाठी व्हाइस सॅम्पल घेतले जात आहेत.
सीआयडी कार्यालयात कराडसोबत आलेल्यांची चौकशी ?
वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्त्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. गाडीमालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील आता सीआयडीच्या रडारवर आहेत. विष्णु चाटे याची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर त्याविरोधात सीआयडी पुरावे गोळा करत आहे.