• Fri. Jan 10th, 2025

    बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 9, 2025
    बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    पुणे, दि. 9 : तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविन्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. गणेश कला क्रिडा मंडळ येथे आयोजित दुसऱ्या मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी कृषी पणन मंडळाचे संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सिंदखेडा बाजार समितीचे सभापती आणि मंडळाचे माजी संचालक नारायण पाटील उपस्थित होते.

    मंत्री श्री. रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावे अशी भूमिका मांडली. त्याला जवळपास 71 देशांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून साजरे करण्यात आले. तृणधान्याचा वापर हा एक वर्षापुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे. तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असेही रावल म्हणाले. तृणधान्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी विविध माध्यमातून प्रचार, प्रसिध्दी करावी. तृणधान्य महोत्सव राज्यातील इतर जिल्ह्यातही घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पणन मंडळ हे उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारा पूल म्हणून काम करेल असे सांगून आपल्या शेतकऱ्यांचा माल जगाच्या बाजारपेठेत पोहोचेल असा संकल्प  सर्वांनी करुया असे ते म्हणाले.

    हा तृणधान्य महोत्सव 12 जानेवारी पर्यंत सुरु असून महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकात दिली.

    सुरुवातीस पणनमंत्री श्री. रावल यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मिलेट जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीस श्री. रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed