Manikrao Kokate On Chhagan Bhujbal: नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचं नाव नसल्याने ते नाराज आहेत. त्यावरुन आता आमदार माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना घरचा आहेर दिला आहे.
पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी कृषी विभागासंबंधी आणि इतर राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, भुजबळ यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
नवीन सरकारच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांचे नाव नसल्यामुळे ते नाराज आहेत. या नाराजीची झळ राज्यात पाहायला मिळाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ओबीसी समाजाने आंदोलन केले. त्यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि मोठा तणाव निर्माण झाला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले. मात्र, भुजबळांची नाराजी पूर्णतः दूर झालेली नाही. कालसुद्धा भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आज आमदार माणिकराव कोकाटे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
कोकाटे म्हणाले, “जो जे वांछील ते ते लाभो.” त्यांना जिथे जायचे असेल, तिथे जाऊ शकतात. तुमचे नेते कोण आहेत? असा प्रश्न विचारला असता कोकाटे म्हणाले, “माझे नेते अजित दादा नाहीत; माझे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.” पक्षाने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले का, असा प्रश्न विचारल्यावर कोकाटे म्हणाले, “पक्षाने भुजबळ यांचा पुष्कळ लाड पुरवला आहे. अजून किती लाड करायचे?”
भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेबाबत कोकाटे म्हणाले, “तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना जिथे जायचे असेल, तिथे जाऊ शकतात.” अशा प्रकारे कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिला.