Walmik Karad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.
कराड आत्मसमर्पण करणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना होती. त्यामुळेच सकाळच्या सुमारास सीआयडीच्या मुख्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला. या बंदोबस्ताची पाहणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केली. आपण आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती वाल्मिक कराडनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन दिली होती. त्यानंतर काही वेळातच तो सीआयडीच्या मुख्यालयात पोहोचला.
Walmik Karad: गुन्हा घडला तेव्हा वाल्मिक अण्णा..; शरण येताना कराड सोबत असलेल्या नगरसेवकाचा भलताच दावा
एका पांढऱ्या रंगाच्या नवाकोऱ्या स्कॉर्पिओमधून कराडनं सीआयडी मुख्यालय गाठलं. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता कराडनं हात जोडले. पुढे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे लिफ्टमध्ये नेलं. कराड कारमधून उतरला, त्यावेळी त्याच्यासोबत पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलेला एकजण होता. तोच स्कॉर्पिओ कारचा मालक असल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवलिंग मोराळे असं त्या पांढऱ्या शर्टमधील व्यक्तीचं नाव आहे. तो केजमधील कंत्राटदार आहे. शासकीय कामांची कंत्राटं तो घेतो. त्याचं एक हॉटेलदेखील आहे. MH 23 BG 2231 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून कराड सीआयडीच्या मुख्यालयात पोहोचला. ही कार मोराळेच्याच मालकीची आहे. मोराळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता आहे. तो कराड यांचाही निकटवर्तीय मानला जातो.
Walmik Karad: आधी पोलीस, मग CID मागावर; २२ दिवस कुठे होता कराड? देशमुखांच्या खुनानंतर ठावठिकाणा कसा बदलला?
सीआयडीनं कराडला ताब्यात घेताना कारमधील दोन मोबाईलही जप्त केले. पण त्यांनी कार जप्त केलेली नाही. कराडला मुख्यालयात सोडणारी पुढच्या काही मिनिटांनंतर शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर दिसली. त्यावेळी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं मोराळेला गाठलं. कराड तुमच्या कारमधून उतरले. तुम्ही कुठून आलात, असा सवाल मोराळेला करण्यात आला. त्यावर कराड आले ती ही कार नव्हती, ती दुसरी कार होती, अशी लोणकढी थाप त्यानं मारली. वार्ताहरानं आणखी काही प्रश्न करताच मोराळे कारमध्ये बसला. प्रश्नांना बगल देत त्यानं तिथून पळ काढला.