Dhananjay Munde activist Arrested: हवेत गोळीबार करुन व्हिडीओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी कैलास फडकडून परवानाधारक पिस्तुल देखील जप्त केले आहे. तर कैलासला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंजली दमानिया यांनी बीडमधील अनेक शस्त्र परवान्याचा विषय लावून धरला आहे. अलीकडेच त्यांनी धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय असणारा कार्यकर्ता कैलास फडचा गोळीबार करतानाचा व्हिडीओ एक्स हँडलवर पोस्ट केला. व्हायरल व्हिडीओचा हवाला देत दमानियांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान अंजली दमानियांनी एक्स हँडलवर बीडमधील कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरुन धनंजय मुंडेंसह पोलिसांना धारेवर धरले आहे. त्यांनी बुधवारी केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले की,’ वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत! आणि एक पिस्तुल धारी माणूस. दाउतपुर ता.परळी येथील सरपंच कांता फड व मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवतात ? वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली?’ तर त्यांनी आज गुरुवारी देखील पुन्हा वाल्मिक कराडांच्या संबंधीची तार छेडली. त्या म्हणाल्या, ‘हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल vision असणार आहे का? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. आणि गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, अशी मागणी देखील त्यांनी पोस्टच्या माध्यामातून केली.

