• Sat. Dec 28th, 2024
    मला विशालसमोर नेऊ नका! पत्नीची पोलिसांना विनंती; गुन्ह्यात साथ देण्यामागचं कारणही सांगितलं

    Vishal Gawali: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मुलीचा मृतदेह टाकून देताना विशाल गवळीला त्याच्या पत्नीनंदेखील साथ दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मुलीचा मृतदेह टाकून देताना विशाल गवळीला त्याच्या पत्नीनंदेखील साथ दिली. तिलाही पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार, हत्येनंतर विशाल गवळी फरार झाला. त्यानं कल्याणहून शेगाव गाठलं. तिथे त्याच्या पत्नीचं माहेर आहे. विशालला शेगावमधूनच अटक करण्यात आली. आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

    १३ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीला आज कोळसेवाडी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. अटकेत असलेल्या विशालच्या पत्नीला (साक्षी) पतीसोबत न्यायालयात नेलं जाणार असल्याचं समजलं. त्यानंतर तिनं पोलिसांना आपल्याला त्याच्यासमोर न नेण्याची विनंती केली.
    आरोपी विशाल गवळी सात दिवस पोलिस कोठडीत, रेल्वेने पोहोचला होता शेगावमध्ये
    मी विशालसमोर गेल्यास तो मलादेखील ठार मारेल अशी भीती साक्षीनं व्यक्त केली. यामुळे पोलिसांनी तिला महिला पोलिसांसोबत न्यायालयात हजर केलं. ‘मी त्याला गुन्ह्यात साथ देण्यास नकार दिला असता तर त्यानं त्या मुलीबरोबर मलादेखील ठार मारलं असतं. म्हणूनच त्याच्या गुन्ह्यात मी त्याला साथ दिली, अशी माहिती साक्षीनं पोलीस चौकशीत दिली.

    आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी बँकेत नोकरी करते. विशालनं १३ वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या केली. त्यावेळी साक्षी घरात नव्हती. तेव्हा ती कामाला गेली होती. साक्षी घरी परतल्यानंतर विशालनं तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी घरात अनेक ठिकाणी रक्ताचे डाग होते. साक्षीनं ते पुसले. विशालसोबत तिनं मुलीचा मृतदेह एका बॅगमध्ये भरला. मग दोघांनी मिळून बॅग एका रिक्षात टाकली. त्यांनी बॅग बापगाव परिसरातन फेकली. त्यानंतर विशालनं दादर गाठलं. तिथून तो शेगावला गेला.
    Kalyan Crime : कल्याण अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपीची तीन लग्नं, बँक कर्मचारी बायकोसोबत बॉडीची विल्हेवाट, दारु ढोसून गावी पळाला
    विशाल गवळी अटक टाळण्यासाठी शेगावला पळाला. पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो लूक बदलण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो सलूनमध्ये गेला. त्या सलूनमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी विशालला शेगावमधून, तर साक्षीला कल्याणमधील राहत्या घरातून अटक केली. विशालची आधी दोन लग्नं झाली आहेत. साक्षी ही त्याची तिसरी पत्नी आहे. विशालवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्याची बरीच दहशत आहे. याच दहशतीला कंटाळून काही कुटुंबानी परिसर सोडल्याची माहिती पुढे आली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed