यवतमाळ, दि.24 (जिमाका) : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आदिवासी विकास मंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके यांनी भेट दिली. यावेळी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने विद्यार्थ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
आंदोलनाला भेट दिल्यानंतर श्री.उईके यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये लागू असलेल्या डीबीटी या योजनेमध्ये प्रत्येकवर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी.
आदिवासी वसतीगृहात प्रवेश झालेल्या मुला-मुलींची वसतिगृहात उपस्थिती किमान 85 टक्के बंधनकारक करावी. तसेच वसतिगृहात सतत 60 दिवस गैरहजर राहिल्यास अशा विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते.
यावेळी श्री.उईके यांच्यासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी बराचवेळ श्री.उईके यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या कशा पद्धतीने निकाली काढता येतील, यावर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपस्थितीत आंदोलन मागे घेतले.
000