• Tue. Dec 24th, 2024
    केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा अत्यावस्थ; रुग्णालयाला आग, एकाचा बळी

    Buldhana Hospital Fire: बुलढाण्यातील लोणार येथील ग्रामीण रुग्णालयाला लागलेल्या आगीत एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

    Lipi

    अमोल सराफ, बुलढाणा: केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र समोर आलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. बुलढाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग लागून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

    लोणार जिल्हा रुग्णालयात रात्रीच्या सुमारास अचानक आग

    मिळालेल्या माहितीनुसार, लोणार येथील जिल्हा रुग्णालयातील जनरल वार्डमध्ये २२ डिसेंबरला रात्री आग लागली होती. या आगीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्णांचं नाव हरिभाऊ बाप्पूजी रोकडे असं असल्याची माहिती आहे. हरिभाऊ रोकडे हे पैठण येथील रहिवासी होते. हरिभाऊ बाप्पूजी रोकडेंना उपचारासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात २२ डिसेंबरला लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या गावापासून काही किलोमीटरवर घडली भीषण घटना

    ही घटना केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या लोणार तालुक्यात घडली आहे. २२ डिसेंबरला दुपारी लोणार बसस्थानकावर एक मनोरुग्ण अत्यावस्थेत आढळून आला होता. हरिभाऊ बाप्पूजी रोकडे अशी या मनोरुग्णाची ओळख पटली होती. अत्यावस्थेत त्यांना तातडीने लोणार येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. हरिभाऊ रोकडे यांच्याकडे कुटुंबीयांबद्दल चौकशी केली असता त्यांनी आपल्यासोबत कुणीच नसल्याचं सांगितलं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

    मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत होरपळल्यामुळे रोकडे यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात ही आग का आणि कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाही. सध्या पोलीस याचा तपास करत आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याच जिल्ह्यातील रुग्णालयात इतकी मोठी घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

    ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ग्रामीण भागातील हे रुग्णालय असल्याने इथे इतर कोणतेही रुग्ण नव्हते. अन्यथा एक मोठा अनर्थ घडला असता. या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क आणि काही चर्चा समोर आल्या आहेत. ज्यामध्ये या रुग्णाने स्वतः मनोरुग्न असल्याने माचीसने बिडी पिण्याकरता काडी ओढली आणि त्यानंतर हा अपघात घडण्याची देखील चर्चे आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही दुजारा प्रशासनाने दिला नाही आहे. चौकशीनंतरच सर्व बाबी समोर येणार आहे. पण, एकंदरीत केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या गावापासून काही अंतरावर लोणार भागातील हे ग्रामीण रुग्णालयामध्ये असे प्रकार घडत असतील तर नेमकं आपल्या आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed