महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ओबीसी समाजाच्या नाराजीबाबत चर्चा झाली असून, फडणवीसांनी ओबीसींचे नुकसान होऊ न देण्याचे आश्वासन दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पुढील निर्णयाबाबत ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमध्ये सामाजिक, राजकीसह अनेक गोष्टींची चर्चा झाली. माध्यमांधून बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. या चर्चेनंतर त्यांनी सांगितलं की, महायुतीला जो काही विजय मिळाला त्यामध्ये ओबीसींचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. पुढचे पाच-सहा दिवस सुट्ट्या आहेत, मला आठ ते दहा दिवस मला द्या आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे चांगला मार्ग शोधून काढू. माझी आपल्याा एक विनंती आहे, ओबीसी नेत्यांना सांगा की मी याच्यावर साधकबाधक विचार करतो आहे हा निरोप ओबीसी घटकांनी द्या. आपण शांततेनं घेऊया आणि दहा बारा दिवसांमध्ये चांगला मार्ग काढून येईल यावर चर्चा करूया, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
भाजपमध्ये प्रवेश करणार का?
मी यापेक्षा जास्तपेक्षा काही सांगू शकत नाही. यापूर्वी मी सगळं काही बोललो असल्याचं सांगत छगन भुजबळांनी या प्रश्नाचं थेटपणे उत्तर देण टाळलं. मात्र राजकीय वर्तुळात छगन भुजबळ राष्ट्रवादीला रामराम भाजपवासी होण्याच्या दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनानुसार ओबीसींची नाराजी कशाप्रकारे दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.