Eknath Shinde Arrived at Daregaon : हायुती सरकारच्या सत्तेची घडी आता बसली आहे. उपमु्ख्यमंत्रीपद शिंदेंना मिळाले असून अखेर सरकारचे खातेवाटपही जाहीर झाले आहे. आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा दरेगावची वाट पकडली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साताऱ्यातील दरेगाव हे त्यांना प्रिय आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही ते अनेकदा गावी जाऊन शेतीत रमल्याचे पाहायला मिळाले. तर ते राज्याच्या कामकाजाच्या गराड्यातून विश्रांती मिळण्यासाठी ते दरेगावी गेल्याचे देखील आपण पाहिले. यातच शिवसेनेच्या नेत्यांकडूनही दावा केला गेला आहे की, एकनाथ शिंदेंना काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरेगावी जाण्याला प्राधान्य देत असतात.
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येणार हे निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दरेगावी मुक्कामी राहणे पसंत केले होते. त्यावेळीही त्यांनी तीन दिवस मुक्कामी राहिले. तर महायुतीच्या महत्त्वाच्या बैठका देखील त्यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द झाल्या होत्या. परिणामी मुख्यमंत्रीपदावरुन शिंदे नाराज आहेत आणि त्यांना सरकारमधील वजनदार असे गृहमंत्रीपद देखील हवे होते, अशा विविध राजकीय चर्चा रंगल्या होत्या.
एकनाथ शिंदे हे कोणावरही नाराज नसून ते आजारी असल्याने आराम करण्यासाठी गावी गेले होते, असे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्यांनी दरेगाव गाठले. परिणामी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या सगळ्या बैठक रद्द केल्या होत्या. एकनाथ शिंदे दरे गावात गेल्याने सत्तास्थापनेची प्रस्तावित बैठक खोळंबली होती. ज्यामुळे सत्ता स्थापनेला विलंब झाला असे चित्र निर्माण झाले होते.