परप्रांतीयांकडून मराठी माणसांवर होणाऱ्या अरेरावी, दादागिरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. कल्याणमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत एका उत्तर भारतीयानं मराठी कुटुंबाला बाहेरुन माणसं आणून मारहाण केल्याची घटना ताजी आहे.
कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आडवली गावातील इमारतीत शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. तो वाद टोकाला गेला. त्यानंतर एका कुटुंबानं दुसऱ्या परिवाराविरोधात तक्रार नोंदवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मराठी कुटुंबानं केला आहे. त्याचा जाब विचारण्यास मराठी कुटुंब गेलं असता, परप्रांतीय कुटुंबाकडून त्यांना मारहाण करण्यात आली.
Mumbai Boat Accident: अखेरच्या क्षणी नौदल अधिकारी सरसावले अन् मोठा अनर्थ टळला; बोट अपघात प्रकरणात नवी माहिती समोर
मराठी कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत शेजारी राहणाऱ्या परप्रांतीयानं अश्लील चाळे केले. त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचं कुटुंब गेलं असता त्यांना मारहाण करण्यात आली. उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीनं मराठी कुटुंबावर हात उचलला. त्या मारहाणीत मराठी कुटुंब जखमी झालं. या जखमींमध्ये पीडित मुलीची आई, वडील, आजी यांचा समावेश आहे. मारहाणीत जखमी झालेला तरुण पोलीस कर्मचारी आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. ‘आडवली परिसरातील दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. ही दोन्ही कुटुंब शेजारी राहतात. मुलांच्या खेळण्यावरुन वाद झाला होता. तक्रारदार कुटुंबानं त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा दावा केला आहे. त्यांची तक्रार घेण्यात आलेली आहे. उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रिना पांडे अशी आरोपींची नावं आहेत. त्यांचा शोध आम्ही घेत आहोत,’ अशी माहिती मानपाडा पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Mumbai Boat Accident: तोपर्यंत आम्हाला लाईफ जॅकेट्सच दिली नव्हती! बोट अपघातातून वाचलेल्या प्रवाशानं काय सांगितलं?
‘तक्रारदार कुटुंबानं विनयभंगासह मारहाण झाल्याचाही दावा केला आहे. त्यानुसार पांडे दाम्पत्यावर कलमं लावण्यात आलेली आहे. त्या दोघांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे,’ असा तपशील पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीयांच्या अरेरावीच्या, गुंडगिरीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. मुंबई, ठाण्यात या घटनांचं प्रमाण जास्त आहे.