alibaug news :चेंढरे येथील हॉटेल ओयो शान येथील कुंटणखान्यावर रायगड पोलिसांची कारवाई पती पत्नी सहित तीनजणांना ताब्यात घेतले.
चेंढरे येथील हॉटेल ओयो शान येथे कुंटणखाना सुरू असल्याची फिर्याद अलिबाग पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनील वसंतपुरी गोसावी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
अशी मिळाली माहिती
याबाबत अलिबाग पोलिस विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अलिबाग पोलिस ठाणे येथे चेंढरे ग्राम पंचायत हद्दीत असणाऱ्या ओयो शान येथे शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल या दाम्पत्याच्या देखरेखीत कुंटणखाना सुरू असून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्यात येत असल्याची महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी पोलिस उप अधीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिली.
नेमकं प्रकरण काय?
दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,व बांगलादेशी पथक यांनी एकत्रित येत त्यांनी हॉटेल मध्ये प्रवेश केले असता पहिल्या माळ्यावरील रिसेप्शन काउंटर येथे मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल (दोघेही राहणार हॉटेल शान ओयो लॉजिंग, एचपी पेट्रोलपंपाचे मागे, चेंढरे ता- अलीबाग, रायगड, महाराष्ट्र, भारत ) यांना ताब्यात घेवून त्यानंतर उपस्थित पंचांसमक्ष हॉटेलची पाहणी केली असता तीन मुली ह्या वेश्याव्यवसाय करीत असतांना मिळून आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून २०हजार ५०० रुपये रोख व दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल
सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या सूचनेनुसार, अलिबाग पोलिस उप विभागीय विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,व बांगलादेशी पथक यांनी संयुक्तरित्या केली आहे.
सदर गुन्ह्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात 206/2024 , भारतीय न्याय संहिता 2023चे 143,3(5), स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) 3,4, 5नुसार कारवाई केली असून अधिक तपास महीला पोलिस उप निरीक्षक शिंदे या करीत आहेत.