Mumbai Boat Accident: गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटल्याची घटना घडली आहे. या बोटीत ८० प्रवासी होते. त्यातील ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५ जण बेपत्ता आहेत.
नीलकमल नावाची बोट दुपारी तीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाण्यास निघाली. या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती. अपघातावेळी बोटीत ८० प्रवासी होते. बोट उरणमधील करंजा परिसरात असताना नौदलाच्या स्पीड बोटनं तिला धडक दिली. स्पीड बोटनं सुसाट वेगात प्रवासी बोटीभोवती एक फेरी मारली. त्यानंतर ती बोटीपासून काही अंतरावर गेली. मग नागमोडी वळणं घेत ती परत आली आणि तिनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली.
स्पीड बोट धडकली, एकाचा पाय कापला गेला, तो आमच्या बोटीत पडला; प्रत्यक्षदर्शीनं थरार सांगितला
अपघातग्रस्त नीलकमलच्या मदतीसाठी सर्वप्रथम सीआयएसएफची शेरा १ ही बोट पोहोचली. या बोटीत केवळ २ जवान होते. प्रवासी बोट फुटून ती बुडत असल्याचं लक्षात येताच त्यांनी मदतकार्य सुरु केलं. जीवाच्या आकांतानं प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते. त्यावेळी सीआयएसएफच्या २ जवानांनी त्यांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सुरु केलं.
सीआयएसएफच्या जवानांनी प्रवासी बोटीला अपघात झाल्याची माहिती त्यांच्या कंट्रोल रुमला दिली. यानंतर कंट्रोल रुमनं आसपासच्या भागांमध्ये असलेल्या स्पीड बोटींना अपघाताची माहिती देत त्यांना अलर्ट केलं. यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये अनेक स्पीड बोटी प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी पोहोचल्या.
Mumbai Boat Accident: वेगात नागमोडी वळणं न् बघता बघता स्पीड बोटची धडक, गेटवे बोट अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO
शेरा-१ बोटीवर असलेले सीआयएसएफ जवानांनी तातडीनं मदतकार्य सुरु केलं. पेट्रोलिंग करत असताना त्यांना अपघातग्रस्त बोट दिसली होती. त्यांनी वेळीच मदतकार्य सुरु केल्यानं आणि अपघाताची माहिती कंट्रोल रुमला दिल्यानं पुढील अनर्थ टळला. त्यांच्यामुळेच लँडिंग पॉईंटहून वेगानं बोटी मदतीसाठी दाखल झाल्या. अवघ्या २ जवानांनी अनेक प्रवाशांचा जीव वाचवला. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.