Ashwini Bhide: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या आठवड्याभरातच त्यांची टीम बांधायला घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच सचिवपदी फडणवीसांनी श्रीकर परदेशींची नेमणूक सचिवपदी केली.
अश्विनी भिडे यांची शासनानं बदली केली आहे. सध्याच्या घडीला भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी आहे. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून झालेली आहे. ब्रिजेश सिंह यांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सिंह यांच्याकडून त्वरित कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारीही भिडे यांच्याकडेच असेल.
Kurla Bus Accident: प्रशिक्षणावेळी दिंडोशी बस डेपोत काय घडलं? मोरेचा जबाब; कुर्ला प्रकरणात चिंताजनक माहिती उघड
अश्विनी भिडेंनी याआधी मेट्रो ३ ची जबाबदारी पार पाडली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणूनदेखील त्यांनी काम केलं आहे. पालिका, मेट्रोमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भिडे यांच्याकडे आता मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत झाडांची कत्तल करण्यात आली होती. ते प्रकरण वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी भिडे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भिडे यांची उचलबांगडी केली होती. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीचं सरकार येताच त्यांच्याकडे पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवण्यात आली.
Kurla Bus Accident: बस चालक मोरे तुरुंगात, पण…; प्रकरणात नवी माहिती समोर, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय?
अश्विनी भिडे १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेलं. कारशेडच्या मुद्द्यावरुन ठाकरे आणि अश्विनी भिडे यांच्यात मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं. नंतर २०२० साली त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं होतं.