MLA Oath Taking Ceremony: नव्याने सत्ताग्रहण केलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ठिणगी पडली. महाविकास आघाडीचे आमदार आज, रविवारी शपथ घेणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी महायुतीचे आमदार प्रचंड उत्साहात होते. शिवसेनेचे आमदार भगवे फेटे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गुलाबी फेटे घालून विधानसभा सभागृहात दाखल झाले. सकाळी ११ वाजता हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी स्थान ग्रहण करताच राष्ट्रगीत आणि राज्यगीताने अधिवेशनाला सुरुवात झाली. कोळंबकर यांनी राज्यपालांकडून आलेला आदेश वाचून दाखवल्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीला कोळंबकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून भाजपचे चैनसुख संचेती, जयकुमार रावल, शिवसेनेचे आशीष जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांची निवड जाहीर केली.
आता मंत्रिपदे, खात्यांवर खल; शिवसेनेला १०, तर ‘राष्ट्रवादी’ला सात कॅबिनेट मंत्रिपदे?
त्यामुळे या चार जणांना सर्वप्रथम विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. या चौघांनी मराठीतून शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. शिंदे यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेत असताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या.
पालिका निवडणुका लवकरच! मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर नाना पटोले यांचे नाव पुकारण्यात आले. तेव्हा शपथ न घेता महाविकास आघाडीचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर पडले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शपथविधीसाठी सहकुटुंब आलेल्या काँग्रेस आमदारांचा हिरमोड झाला.