Sharad Pawar News: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवर शरद पवार यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मारकडवाडी बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली.
निवडणूक प्रक्रिया संपली आहे. आम्ही काही आकडेवारी जमा केली त्यामध्ये प्रत्येक पक्षाला किती मते पडली याची माहिती घेतली. मतांची आकडेवारी आश्चर्यकारक आहे. काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. मात्र शिंदे यांना ७९ लाख मते पडली पण त्यांचे ५७ आमदार निवडून येतात. याचा अर्थ एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. आमची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि अजित पवार गटाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही तोपर्यंत आम्ही बोलत नाही. आताच चार निवडणुका झाल्या आहेत, हरियाणा मध्ये भाजपची अवस्था अतिशय वाईट होती,पण तिथे भाजप आला. जिथे छोटी राज्य आहेत तिथे, वेगळे चित्र आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.
मारकडवाडीमधे बंदी घालण्याचं कारण काय होत?
मारकवाडी येथे ईव्हीएमला विरोध करत ग्रामस्थ बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बंदी घालत प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यावर देखील शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधत, राज्यात निवडणूक होऊन गेली, मग गावची माणसे जुन्या पद्धतीने प्रयोग करून पाहणार होते. मग मारकडवाडीमधे बंदी घालण्याचं कारण काय होत? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे, त्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत. निकाल काहीही लागला तरी थांबायचं नसत मी निकाल लागलेल्या दुसऱ्या दिवशी कराडला आलो, असे ही शरद पवार म्हणाले आहेत. राज्यात महायुतीकडून विरोधी पक्ष प्रभावी असू नये याची काळजी घेतली जात आहे. पण लोकांमध्ये सगळ्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात फोडाफोडीचे राजकारण थांबेल असे दिसते नाही. कुठं कुठं काय काय चालू आहे असे दिसत आहेत, असे ही पवार म्हणाले आहेत.
शक्तिपीठला ज्याचा ज्याचा विरोध आहे, त्याच्याशी आम्ही बोलणार
दरम्यान राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातून मोठा विरोध होत आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून मोठे आंदोलन उभा करण्यात आले होते. निवडणुका तोंडावर असल्याने राज्य सरकारने हा शक्तिपीठ महामार्ग स्थगित केला होता. मात्र आता काल एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होणारच, असे म्हणाले आहेत यानंतर शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. या संदर्भात देखील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून शक्तिपीठला ज्याचा ज्याचा विरोध आहे, त्याच्याशी आम्ही बोलणार आहोत. त्याचा विरोध असेल तर आम्ही सरकार समोर तशी भूमिका मांडू, असे पवार म्हणाले आहेत.