• Sat. Jan 4th, 2025
    तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ

    Ajit Pawar Answers Eknath Shinde Question: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर तिघांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. शिंदेंनी याबद्दलचा सस्पेन्स आजही कायम ठेवला.

    ‘एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, राज्याच्या हितासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेचे आमदारदेखील त्यासाठी आग्रही आहेत. त्यांना याबद्दल मी विनंती केली आहे. याविषयीचा निर्णय ते संध्याकाळपर्यंत घेतील. ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदे असणार की नाही हा प्रश्न कायम राहिला.
    ते आधी डोक्यातून काढून टाका! अजितदादांनी वाचली दिल्ली भेटीच्या कारणांची लांबलचक यादी
    देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. मग एकनाथ शिंदे बोलू लागले. तेव्हा त्यांनाही शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही दादांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का, असा थेट सवाल पत्रकारांकडून विचारला गेला. त्यावर आताच देवेंद्रजींना याबद्दल सांगितलंय. मी पण सांगतोय, थांबा थोडं. संध्याकाळपर्यंत थांबा. शपथविधी उद्या आहे, असं उत्तर शिंदेंनी दिलं.

    शिंदे उत्तर देत असताना अजित पवार यांनी त्यांचं मध्येच तोडलं. ‘संध्याकाळपर्यंत त्यांच्या शपथविधीचं समजेल. पण मी तर शपथ घेणार आहे,’ असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर एकच हास्यकल्लोळ उडाला. अजित पवारांचं मिश्किल विधान ऐकून सारेच हसले. फडणवीस, शिंदेंनाही त्यांचं हसू आवरता आलं नाही.
    Devendra Fadnavis: राज्यात MP, राजस्थान पॅटर्न नाही! देवाभाऊंच्या निवडीमागे १० कारणं; तिसरं दादा, भाईंसाठी सूचक
    अजित पवारांच्या विधानावर सारेच हसत असताना एकनाथ शिंदेंनी संधी साधत चौकार मारला. ‘दादांना संध्याकाळी शपथ घ्यायचाही अनुभव आहे आणि सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे,’ असं शिंदे म्हणाले. त्यानंतर पुन्हा हशा पिकला. शिंदेंच्या टोल्यानंतर पुन्हा एकदा दादा बोलले. ‘आम्ही दोघांनी सकाळी शपथ घेतली होती. ते राहून गेलं होतं. आता पुढे ५ वर्षे राहणार आहोत,’ असं अजित पवार म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed