• Thu. Jan 2nd, 2025
    Akshay Shinde Case: संयमाचा अंत पाहू नका, CIDची पुन्हा कानउघाडणी, उच्च न्यायालयाचा इशारा

    Badlapur School Two Girl Abused Case: बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अक्षयला २३ सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुन्ह्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिस वाहनातून नेले जात असताना मुंब्रा बायपास येथे चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

    हायलाइट्स:

    • आमच्या संयमाचा अंत पाहू नका
    • CIDची पुन्हा कानउघाडणी
    • उच्च न्यायालयाचा इशारा
    महाराष्ट्र टाइम्स
    अक्षय शिंदे कोर्ट सुनावणी

    मुंबई :‘अक्षय शिंदे चकमक प्रकरणाचा तपास गांभीर्याने होत असल्याचे का दिसत नाही? कोठडी मृत्यूविषयीची चौकशी होण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अद्याप सर्व तपशील का देण्यात आला नाही? वैद्यकीय पुराव्यांविषयीची कागदपत्रे अद्याप का गोळा केली नाहीत? न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पूर्ण माहिती जाऊ नये, असा काही जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे का?’, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा सीआयडीची कानउघाडणी केली. आमच्या संयमाचा अंत पाहू नका’, अशा शब्दांत खंडपीठाने सीआयडीला फटकारले.बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अक्षयला २३ सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुन्ह्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिस वाहनातून नेले जात असताना मुंब्रा बायपास येथे चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर ‘ही चकमक बनावट आहे. माझ्या मुलाचा चकमकीत मृत्यू झाला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या, हा सर्व बनाव आहे. या कृत्यामागे राजकीय हेतू आहे’, असा आरोप अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी अॅड. अमित काटरनवरे यांच्यामार्फत याचिकेद्वारे केला. त्यामुळे राज्य सरकारने तपासासाठी नेमलेल्या सीआयडीच्या तपासावर न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून सध्या देखरेख करण्यात येत आहे.
    राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर, इथे कुणीही समाधानी नाही; नितीन गडकरींचे राजकारणावर मार्मिक भाष्य

    या तपासाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसत आहे, असे निरीक्षण नोंदवून आणि तपासातील अनेक त्रुटी दाखवून खंडपीठाने १८ नोव्हेंबर रोजीही सीआयडीची झाडाझडती घेतली होती. तसेच आणखी दिरंगाई न करता तपासाचा सर्व तपशील दोन आठवड्यांत न्यायदंडाधिकाऱ्यांकडे देण्याचे निर्देशही दिले होते. तरीही तपासात व न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांत त्रुटी असल्याचे सोमवारी समोर आल्याने खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जे काही राहिले असेल ते एक आठवड्यात न्यायदंडाधिकाऱ्यांकडे देऊ, अशी ग्वाही सीआयडीतर्फे देण्यात आली. त्यानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून खंडपीठाने पुढील सुनावणी २० जानेवारी २०२५ रोजी ठेवली.

    ‘तुमच्या वर्तनाने संशयाला वाव’

    ‘सीआयडी या तपासाविषयी उदासीन कसे असू शकते? हा कोठडीतील मृत्यूशी संबंधित विषय आहे. स्थानिक पोलिसांपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याच्या धारणेतून तपास सीआयडीकडे दिला जातो. तुमच्याकडून काय अपेक्षा होत्या आणि आता काय अपेक्षा ठेवायच्या? तुमच्या अशा वर्तणुकीमुळे संशयाला वाव निर्माण होत आहे. सर्व अंगांनी तपास होऊन संपूर्ण तपशील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जाणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते चौकशीचा योग्य अहवाल देऊ शकतील. त्यामुळे तपास गांभीर्याने करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed