• Sat. Dec 28th, 2024
    महाराष्ट्राला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर PM मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा

    Oath-taking ceremony of the Maha-Yuti Government in Maharashtra: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १३ दिवसांनी म्हणजे ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना होणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या शवथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

    राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती.

    बावनकुळे यांनी शपथविधीची वेळ आणि तारखी सांगितली असली तरी अद्याप मुख्यमंत्री कोण असेल आणि मंत्रिमंडळ असे असेल याचे उत्तर मिळालेले नाही. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ३ तारखेला दुपारी १ वाजता होणार आहे. या बैठकीसाठी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत. बैठकीत विधीमंडळातील नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात भाजपचे 25 कॅबिनेट मंत्री, शिवसेना 9 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री तर राष्ट्रवादी 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री यांचा शपथविधी होईल. यात गृहमंत्रीपद हे भाजपकडे राहणार असल्याचे समजते.

    राज्यात विधनसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. इतके मोठे बहुमत मिळाल्यानंतर देखील सरकार स्थापन करण्यात उशीर होत असल्यावरून महाविकास आघाडीकडून टीका सुरू होती. राज्यातील मावळत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला नव्या सरकारमध्ये काय आणि कसे स्थान असेल यावरून बरीच चर्चा सुरू आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे स्पष्ट केले आहे.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed