• Thu. Nov 28th, 2024
    शिंदेंची माघार, २८ तास उलटले, तरीही पेच कायम; ५ महत्त्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित

    Maharashtra CM: सत्ता स्थापनेसाठी, मुख्यमंत्रिपदाबद्दल भाजप नेतृत्त्व घेईल तो निर्णय मला आणि शिवसेनेला मान्य असेल, असं म्हणत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: सत्ता स्थापनेसाठी, मुख्यमंत्रिपदाबद्दल भाजप नेतृत्त्व घेईल तो निर्णय मला आणि शिवसेनेला मान्य असेल, असं म्हणत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे स्पष्ट झालं. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरुन माघार घेतली. त्याची घोषणा काल संध्याकाळी साडे चारच्या सुमारास पत्रकार परिषदेत केली. शिंदेंनी माघार घेऊन आता २८ तास उलटले आहेत. पण यानंतरही ५ महत्त्वाचे प्रश्न कायम आहेत.

    १. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
    भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. भाजपच्या बहुतांश नेत्यांचा, संघाचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. पण भाजपनं अद्याप तरी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी अद्याप तरी त्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी कोण, हा सस्पेन्स कायम आहे. महाराष्ट्रात राजस्थान किंवा मध्य प्रदेश पॅटर्न राबवला गेल्यास नव्या चेहऱ्याला संधी मिळेल. त्यामुळे आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मेघना बोर्डीकर यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे.

    २. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण?
    महायुती सरकार २.० मध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री अशी रचना असेल. भाजपकडे मुख्यमंत्रिपद आणि सेना, राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद अशी वाटणी असणार आहे. अजित पवारच राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री असतील. पण शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण, हा प्रश्न कायम आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर शिंदे उपमुख्यमंत्री होणार का, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. शिंदे सरकारबाहेर राहिले, तर उपमुख्यमंत्रिपदीसाठी श्रीकांत शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्या नावांची चर्चा आहे.

    ३. मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिवसेनेला त्या बदल्यात काय काय?
    शिवसेना नेते, आमदार शिंदेंनाच मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळावं यासाठी आग्रही असताना शिंदेंनी दोन दिवस मौन बाळगलं. या कालावधीत त्यांनी बार्गेनिंग पॉवर मिळवली. मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिंदेंना कोणकोणती खाती मिळणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

    ४. सत्ता वाटपाचं सूत्र काय?
    भाजप महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असल्यानं मंत्रिमंडळात त्यांचे सर्वाधिक सदस्य असणार आहेत. पण ते किती असणार, शिवसेना, राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं मिळणार, याबद्दल अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती तीनपैकी एकाही पक्षातील नेत्यानं दिलेली नाही.

    ५. विधानसभेचं अध्यक्षपद कोणाला?
    युती, आघाडीतील सर्वात मोठा पक्ष विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवतो. साधारणत: अशाच प्रकारची रचना अनेकदा दिसली आहे. पण कधी कधी याला छेद देण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडे विधानसभा अध्यक्षपद होतं. त्यावेळी काँग्रेस मविआतील तिसरा मोठा पक्ष होता. विधानसभेच्या कामकाजावर वर्चस्व ठेवण्यासाठी अध्यक्षपद महत्त्वाचं असतं. त्यामुळे सत्ताधारी पक्षांचा या पदावर डोळा असतो. महायुतीत हे पद कोणत्या पक्षाकडे जाणार, हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed