BJP Meghana Bordikar wins Jintur Vidhan Sabha Election 2024: जिंतूर विधानसभा मतदारसंघात 2024ची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली. सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक अंतिम टप्प्यात आल्यानंतर तिरंगी झाली. मात्र अटीतटीच्या या लढतीत मेघना बोर्डीकरांनी बाजी मारली आहे.
मेघना बोर्डिकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांना ४ हजार ५१६ मतांनी पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नांगरे यांनी देखील तब्बल ५६ हजार ४७४ मध्ये घेतली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा वंचित बहुजन आघाडी मुळेच पराभव झाला होता.
PM Modi On Maharashtra Election 2024: ‘महाराष्ट्रातील विजय हा घराणेशाहीचा पराभव’, PM मोदींनी फडणवीसांसह शिंदे-अजित पवारांचे केले कौतुक
भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला असून यंदा तब्बल १ लाख १३ हजार ४३२ मते घेतली आहेत. तर त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे एक लाख आठ हजार ९१९ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नांगरे यांनी ५६ हजार ४७४ मध्ये घेतली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा ३ हजार मतांनी विजय झाला होता. आता २०२४ मध्ये मताधिक्क्यात वाढ झाली आहे.
निवडणुकीच्या काळात मराठा आंदोलकांचा त्यांना प्रचंड विरोध देखील पत्करावा लागला. दसरा मेळाव्याला नारायणगडावर न जाता भगवानगडावर जाऊन त्यांनी मराठा समाजाचा आक्रोश ओढवून घेतला होता. असे असताना देखील त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली आहे. काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी मेघना बोर्डीकरांना पाडा, असा संदेश देखील जाहीर केला होता. पण नंतर त्यांनी निवडणुकीमध्ये न पाडण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीतही आमदार मेघना बोर्डीकर या विजयी झाले आहेत. त्यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जिंतूर येथे भव्य अशी सभा घेतली होती. त्याचबरोबर भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी जिंतूर येथे येऊन ओबीसी बांधवांना मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन देखील केले होते.
मतदानाच्या आदल्या दिवशी आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य देखील त्यांनी केल्याचे दिसून आले आणि या क्लिपची संपूर्ण जिल्हाभर चर्चा देखील झाली होती. एवढे होऊन देखील आमदार मेघना बोर्डीकर यांना विजय मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांचा प्रभाव होता मात्र विधानसभेत तो धुसर झाल्याचे चित्र आहे.