Worli Shiv Sena UBT Aaditya Thackeray vs Shiv Sena Milind Deora Vidhan Sabha Election 2024 Result: तुल्यबळ उमेदवार नसल्याने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना त्यांचा विजय सहजसाध्य होता, मात्र यंदा विजय कठीण मानला जातो.
स्वतःचा प्रचार करायचा आणि त्याचबरोबर आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घ्यायच्या, अशी दुहेरी जबाबदारी वरळीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर होती. त्यानुसार नियोजन करीत आदित्य यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले. मुंबईतील बहुतांश सर्वच उमेदवारांच्या मतदारसंघातही आदित्य यांनी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात त्यांना पूर्ण दिवस काढता येत नाही. अशावेळी त्यांच्या प्रचाराची धुरा पक्षाची येथील स्थानिक नेतेमंडळींनी सांभाळली.
आदित्य यांनी वरळीमध्ये केलेली कामे मतदारांपुढे ठेवतानाच वरळी कोळीवाडा येथील क्लस्टरला असलेला विरोध मतदारांपर्यंत पोहोचवला गेला. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही आदित्य यांच्यासाठी प्रचारफेरी काढत सभा घेतली. स्थानिक नेत्यांची फौज आणि परंपरागत मतदारांची मिळत आलेली साथ यामुळे त्यांचे पारडे जड दिसत आहे.
ज्या धनुष्यबाण चिन्हावर येथील मतदारांनी मोहोर उमटवली, त्यावर यावेळेस काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले मिलिंद देवरा निवडणूक लढवत आहेत. मिलिंद देवरा दक्षिण मुंबईचे खासदार होते. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघ त्यांना चांगला परिचित आहे. देवरा काँग्रेसमध्ये असताना त्यांनी येथील उच्चभ्रू वस्तीमधील मतदार बांधला होता. हाच मतदार आता धनुष्यबाणाकडे वळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. देशपांडे यांच्या प्रचारासाठी राज यांनी या मतदारसंघात दोनवेळा सभा घेतल्या आणि शिंदेच्या शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीवर त्यांनी टीका केली. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सभांमध्ये टीकास्त्र सोडले आहे. संदीप यांच्या प्रचारामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा चांगला सहभाग होता.