• Sun. Nov 24th, 2024

    विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर

    विधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर

    Baramati Vidhan Sabha Constituency : बारामतीत विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर झळकू लागले आहेत. अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. या निवडणुकीत अजित पवार जिंकले तर ते आठव्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक पडकर, बारामती : विधानसभेचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच निकालापूर्वीच बारामतीतील सुपा या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असलेले बॅनर झळकू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाल्यापासून बारामतीत दोन गट आपापल्या पक्षासाठी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभेतही दोन्ही गटाकडून आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्याचे दिसून आले.

    लोकसभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या सामन्यात खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. आणि कधी नव्हे ते बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे युगेंद्र पवार यांच्यात हा सामना रंगला. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार सलग सात वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. योगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असले. तरी त्यांना बारामती मतदारसंघातून बहुतांशी अनुकूल वातावरण असल्याचे दिसून आले.

    काका विरुद्ध पुतण्या या चुरशीच्या सामन्यात बारामतीकरांनी कोणाच्या बाजूने कौल दिला. हे अवघ्या काही तासातच समजेल. मात्र तत्पूर्वी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री,तसेच आठव्यांदा आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन या मजकुराचे फलक बारामतीत जळकू लागले आहेत. सध्या बारामती परिसरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू असून, ठिकठिकाणी चर्चा होत आहे. मतदानाच्या दिवशी युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी बोगस मतदान केल्याचा आरोप केला होता.

    बारामती तालुक्यातील सुपा परगणा परिसरातील प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराच्या वतीने बॅनर उभारण्यात आला आहे. सदर बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयाचा नाम उल्लेख करत “भावी मुख्यमंत्री” तसेच आठव्यांदा आमदार झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा…या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *