Ajit Pawar Exclusive Interview: ‘बटेंगे तो कटेंगे’ हे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे. ते उत्तरेच्या राज्यातील आहेत. ही भूमी फुले, शाहू, आंबेडकरांची असून इथे अशी भाषा चालणार नाही’, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी निवडणुकीत महायुतीच्या पावणे दोनशे जागा नक्की येतील, असा विश्वास व्यक्त करीत भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणांना ठाम विरोधही केला. भाजपमधीलच अनेक नेते या घोषणांना विरोध करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘ लाडकी बहीण’ सारख्या योजना समाजातील वंचित वर्गाचे मनोबल वाढवणाऱ्या असून, या योजनांमुळे अर्थकारणाला चालनाच मिळते, असेही ते म्हणाले. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनांची भविष्यातही अंमलबजावणी करणे शक्य आहे, असे अजित पवार म्हणाले.
– लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीची कामगिरी फारच वाईट झाली, त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?
– लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेले राज्यातील वातावरण आणि आत्ताचे वातावरण यात खूपच फरक आहे. त्यावेळी आम्हाला विरोधकांनी पसरवलेल्या फेक नॅरेटिव्हचा खूप मोठा फटका बसला होता. संविधान बदलणार, राखीव जागा काढून टाकणार… अशा अनेक अफवांमुळे या राज्यातील अनुसूचित जाती व जमातींमध्ये एक प्रकारची भीती पसरवली गेली. त्याचा मोठा फटका आम्हाला बसला होता.
-असा फेक नॅरेटिव्ह पसरवला गेला, की भाजपच्याच काही नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली होती…?
-नाही. तुम्ही हा सगळा प्रकार कसा सुरू झाला, हे नीट लक्षात घ्या. ‘अब की बार चारसो पार’ ही घोषणा त्यावेळी भाजपकडून करण्यात आली होती. या घोषणेनंतर हे सगळे पद्धतशीरपणे सुरू करण्यात आले. त्यांना चारशे जागा कशासाठी हव्यात? सरकार स्थापन करण्यासाठी तर पावणेतीनशे जागा पुरतात. यांच्याकडे तीनशे जागा तर आहेतच. मग या चारशे जागा त्यांना राज्यघटना बदलण्यासाठीच हव्या आहेत. एकदा राज्यघटना बदलली की मग राखीव जागाही काढून टाकतील, असा प्रचार पद्धतशीरपणे केला गेला. इतकेच नव्हे, काही अफवा तर राज्यातील मुस्लिम बांधवांमध्येही पसरवल्या गेल्या. केंद्र सरकारने ज्या देशांमध्ये राजकीय, सामाजिक अस्थिरता आहे, तिथे राहणाऱ्या भारतीय हिंदूंना पुन्हा भारतात यायचे असल्यास त्यासाठी ‘सीएए’ कायदा आणला होता. मात्र विरोधकांनी असे पसरवले की, त्या कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाईल, इथे त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला जाईल. हे त्यांच्या मनात खोलवर बिंबवण्यात विरोधक यशस्वी ठरले. त्यामुळे मुस्लिमांच्याही मनात शंका निर्माण झाली होती. समाजातील अनेक घटकांमध्ये यांतून गैरसमज निर्माण झाल्याने ते महाविकास आघाडीच्या बाजूने एकवटले आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. आता मात्र त्या समाजांना खरी परिस्थिती समजल्याने ते सरकारच्या योजना आणि आमची कामगिरी जोखूनच मतदान करतील, असे चित्र आहे.
मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
-सरकारने लाडकी बहीणसारख्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र तुम्ही कायम आर्थिक शिस्तीबाबत बोलत असता. या योजना राबविणे म्हणजे आर्थिक बेशिस्तीचाच प्रकार आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
-समाजातील ‘नाही रे’ घटकासाठी कोणत्याही योजना सरकारने राबवायला घेतल्या की, त्याबद्दल अशा प्रकारची ओरड समाजातील एक अत्यल्प वर्ग कायमच करत राहातो. आम्ही ‘लाडकी बहीण’सारखी योजना आणून या राज्यातील कष्टकरी, निम्न मध्यमवर्गीय, गोरगरीब स्त्रियांच्या चेहऱ्यावर थोडे हसू फुलवले. त्यांच्या दररोजच्या कष्टप्रद आयुष्यात थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक स्त्रिया तर आपल्या हुशारीने आणि मेहनतीने छोटे, मोठे व्यवसायही करू पाहत आहेत. त्यांना यातून थोडी का होईना मदत झाली तर चूक काय? विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात ५० टक्के शुल्कमाफी केली, शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले, याकडे आर्थिक दृष्टिकोणातून पाहिले तरी चूक काहीच नाही. या घटकांच्या जगण्याच्या संघर्षात जेव्हा जेव्हा सरकारतर्फे मदत केली जाते, तेव्हा हे सगळे घटक अधिक जोमाने काम करतात. राज्याच्या व पर्यायाने देशाच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालतात. आपणच नव्हे तर जगाला आर्थिक शिस्तीचे धडे देणारे अनेक विकसित देशही हेच करतात. करोनानंतर अनेक प्रगत राष्ट्रांनी काय केले, याची माहिती तुम्ही घ्यावी. या राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी अनेक वर्षे काम केले आहे. जेव्हा समाजातील या घटकांना सरकारने मदत केली, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून राज्यातील अर्थव्यवस्था कालांतराने अधिकच बळकट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
-तुम्हाला या सगळ्या योजना भविष्यातही कायम ठेवता येतील, असे वाटते का?
-आम्ही जाहीर केलेल्या सगळ्या योजनांसाठी एकूण ७५ हजार कोटींचा खर्च येणार आहे. सुरुवातीला आमच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली. या योजनांसाठी निधी कुठून आणणार, असे प्रश्नही केले. नंतर समाजातूनच त्याची प्रतिक्रिया उमटू लागल्यावर ते घाबरले व त्यांनी आमच्या पुढे जाऊन यापेक्षा अधिक पैसे देणाऱ्या योजना आणू, असे सांगत आमच्या योजनांची कॉपी केली. आम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेला १५०० रुपये देत आहोत, तर त्यांनी थेट ३००० रुपये देण्याची घोषणा केली. शेतकरी विम्याची रक्कम पाच लाखांवरून २५ लाखांवर नेली, विद्यार्थ्यांच्या अनुदानातही अशीच वाढ करण्याचे आश्वासन दिले. विरोधकांच्या सगळ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करणार? राज्याच्या अर्थसंकल्पीय जमाखर्चाचा ताळमेळ जरा त्यांच्यातील तज्ज्ञांनी जोडून दाखवावा. राज्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती असलेल्या कोणत्याही तज्ज्ञाला आम्ही दिलेल्या योजनांबाबत विचारून पाहा, आमच्या योजना राबवल्या जाऊ शकतात व त्या आम्ही चांगल्या पद्धतीने राबवणारच. आम्ही जाहीर केल्याकेल्याच महिलांच्या खात्यात थेट पैसे गेले की नाही?
आजचा रविवार ‘सुपर कॅम्पेन डे’! खर्गे, शहा, प्रियंका गांधी उपराजधानीत, कुणाची कुठे होणार सभा?
-सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडी योजना कशा राबवणार, हे आम्ही विचारले होते. त्यावर, तुमच्या सरकारने अनेक प्रकल्पांच्या किंमती विनाकारण वाढवल्या असल्याचा आरोप त्यांनी उत्तरात केला होता. पुण्यातील रिंग रोड १८ हजार कोटींवरून ३८ हजार कोटींवर नेल्याचेही त्यांनी म्हटले होते. अशा प्रकल्पांची चौकशी करून त्यातील अतिरिक्त पैसा अशा लोकोपयोगी योजनांसाठी वापरता येईल, अशी त्यांची भूमिका होती. प्रकल्पखर्चाच्या या आरोपावर तुमचे उत्तर काय?…
– थापाच मारायच्या असतील तर त्यांना मारू देत. असल्या तर्कानेच राज्याची पार वाट लागते. माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. चौकशा सुरू झाल्या. अनेक अधिकाऱ्यांना त्रास दिला गेला. यातून झाले काय? अनेक सिंचन प्रकल्पांची कामे खोळंबली. एकदा कामे बंद पडली की पुन्हा सुरू करताना किंमतीत वाढ होते. कारण दरम्यानच्या काळात महागाई वाढलेली असते. प्रकल्पासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट आदी वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली असते. त्यामुळे प्रकल्पांच्या किंमती आधीपेक्षा खूप वाढू लागल्या. अखेर यातून किती नुकसान होतेय, हे देवेंद्र फडणवीस यांच्याच लक्षात आले व त्यांनी पुन्हा सगळ्या योजना सुरू केल्या. काहीही बोलायचे आणि एखादा प्रकल्प बंद पाडायचा यातून त्याची किंमत वाढविण्यापलिकडे काहीही होत नाही. प्रत्यक्षात ज्या सर्वसामान्यांनी दिलेल्या करातून हे राज्य आपण चालवतो, त्यांच्यावर अधिक बोजा पाडण्याचेच काम आपणे करत असतो. त्यामुळे या असल्या थापांकडे फार गांभीर्याने पाहण्याचे कारण नाही.
-एकीकडे तुम्ही शाहू, फुले आंबेडकर विचारधारा सोडली नसल्याचे सांगत आहात, दुसरीकडे तुमच्या युतीमधील भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘व्होट जिहाद’ अशी भाषा वापरत आहेत…. त्याबाबत काय सांगाल…
-मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेतही हे स्पष्ट केले की, आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. आम्ही आमच्या विचारधारेवर ठाम आहोत. ‘बटेंगे तो कटेंगे’ हे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे. ते उत्तरेच्या राज्यातील आहेत. ही भूमी फुले, शाहू, आंबेडकरांची आहे, इथे अशी भाषा चालणार नाही. भाजपच्याच पंकजा मुंडे, अशोक चव्हाण आदी नेत्यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’चा विरोध केला आहे, हे देखील लक्षात घ्या. मी उमेदवारी देतानाही सर्व समाजांचा विचार केला आहे. अल्पसंख्य समाजाला १० टक्के, अनुसुचित जातींना १२.५ टक्के, अनुसूचित जमातींना १२.५ टक्के, महिलांना १० टक्के अशा एकंदर ४५ टक्के तिकिटे समाजातील शोषित घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आमच्या पक्षाने दिली आहेत. माझ्या सहकाऱ्यांचे आणि पक्षाचे विचार यातूनच सुस्पष्ट होतात. मुंबई आणि महामुंबई विभागात तर मी अल्पसंख्य समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले आहे. पंतप्रधान मोदी यांचीही भाषणे वेगळी आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षालाच लक्ष्य केले आहे. व्यक्तिगत टीका त्यांनीही टाळली आहे. त्यामुळे सूज्ञ जनतेला जे समजायचे ते व्यवस्थित समजले आहे, असे मला वाटते.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब! मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ला, इम्फाळ खोऱ्यात संचारबंदी
तुम्ही राज्यभर फिरत आहात, जनतेत तुम्हाला कसा प्रतिसाद आहे, महायुतीच्या किती जागा येतील असे वाटते?
-जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘लाडकी बहीण’ ही योजना गेम चेंजर ठरणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो. जिथे जिथे मी जातोय तिथे तिथे महाप्रचंड गर्दीच्या सभा होत आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दुसरीकडे विरोधकांना गर्दी जमविण्यासाठी खूप प्रयास पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये आमच्या विरोधकांनी पैसे देऊन एका जाहीर कार्यक्रमासाठी महिला जमवून आणल्या होत्या. मात्र त्या स्वतःहून आलेल्या नसल्यामुळे वेळ वाढत गेला, तशा चिडल्या आणि तिथे भयंकर गोंधळ उडाला. हे असेच चित्र जागोजागी दिसत आहे. महायुती पावणेदोनशे जागांखाली येणार नाही, हे लिहून घ्या.
– या निवडणुकीत प्रचाराचा एकंदर स्तर आणि अनेक उमेदवार, नेते, कार्यकर्ते यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे, असे वाटते का? शरद पवारांसारखे कायम भाषेबाबत सजग असणारे नेतेही ‘गद्दार’सारखे शब्दप्रयोग करत आहेत…
– निवडणुकांमध्ये अनेकांचा भाषणाच्या ओघात स्तर सुटतो हे खरे आहे. हे व्हायला नको, असे सगळ्याच पक्षातील नेत्यांना वाटते. मात्र त्यावर नियंत्रण आणणे आजवर कुणालाच शक्य झालेले नाही. पवार साहेबांबाबत म्हणाल तर त्यांचे आता वय झाले आहे. वयोमानानुसार त्यांच्या भाषणाची पूर्वीची ढब बदलली असावी. काही दिवसांपूर्वी हडपसर येथील सभेत त्यांना उमेदवाराच्या नावाचाही विसर पडला. प्रशांत जगताप हे तिथे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. साहेबांनी, प्रशांत तुपे यांना निवडून द्या, असे सांगितले. अखेर त्या उमेदवारालाच जाऊन आपले नाव सांगावे लागले. त्यामुळे काही गोष्टी या समजूनही घ्यायल्या हव्यात, असे मला वाटते.