• Mon. Nov 25th, 2024

    पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 14, 2024
    पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला.

    राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी,  दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोग यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेद्वारे (postal ballot Paper) मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२’ किंवा ‘१२ अ’ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संबधित निवडणूक अधिकारी यांनी पडताळणी करून टपाली मतपत्रिका दिली. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात मतदारसंघात आज निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहात टपाली मतदान केले.

    सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या मतदारसंघात १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. धारावी मतदारसंघात केवळ आजच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वडाळा मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबर, वरळी मतदारसंघात १६ ते १७ नोव्हेंबर, माहीम मतदारसंघात १६  नोव्हेंबर रोजी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी टपाली मतदान केल्याचे समाधान पोलिस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. टपाली मतदानानंतर अनेक पोलीस कर्मचारी अतिशय उत्साहाने, अभिमानाने मतदान केल्याची निशाणी असलेले आपले बोट अभिमानाने उंचावत सेल्फी काढताना दिसून येत होते.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ/

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *