Ramtek Vidhan Sabha: माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वे हे रामटेक येथील महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल बरबटेंविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र मुळक यांच्यासाठी प्रचार करीत आहेत.
यंदा रामटेक येथून माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना निलंबनही केले. आज सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात मुळक यांची प्रचार सभा झाली. तेथे काँग्रेसचे केदार आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे आदी उपस्थित होते. या तिघांनी मुळक यांचा प्रचार केला तसेच त्यांच्या प्रचारार्थ भाषणे दिली. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मुळक यांच्यासाठी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात असल्याचे चित्र दिसून येते आहे.
तसेच उमरेडचे काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांच्यासाठी मुळक यांनी मांढळ येथे संध्याकाळी सभा घेतली. मुळक यांचे उमरेड मतदारसंघावर चांगले वर्चस्व आहे. त्यांनी मेश्राम यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होतेच. आता ते त्यांच्यासाठी थेट प्रचारसुद्धा करीत आहेत. पक्षाने मुळक यांना निलंबित केल्यानंतरही हे सर्व काही घडत असल्याने मुळकांवरील कारवाई केवळ औपचारिक असल्याची भावना महाविकास आघाडीत आहे. किंवा स्थानिक नेत्यांनी पक्षातील वरिष्ठांच्या सूचना व आदेशांना केराची टोपली दाखविली आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.