Aditya Thackeray Criticize CM Shinde: आळंदीतील सभेतून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर घणाघात केला आहे. ‘हे’ उद्या ठाकरे आडनाव लावून देखील फिरतील, असा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला राजकारणातून संपवायचं आहे, असं यांना वाटलं. अगदी उद्या ‘हे’ ठाकरे आडनाव लावून ही फिरतील. एकवेळ असा विचार करा, आम्ही राजकारणातून बाहेर झालो. पण, एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना.
नवे सरकार कोणाचे? राज्यातील या ३७ जागा ठरवणार महाविकास आघाडी अन् महायुतीचा फैसला, विजयाचे अंतर फक्त…
‘महाराष्ट्राला डिवचण्यासाठीच मोदींचा रोड शो’
यासोबतच आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या बडोद्यातील रोड शो वरुन देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ‘बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला, नरेंद्र मोदी सांगतील का? देतील का याचं उत्तर? तिथं कोणती ही निवडणूक नाही. महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार पळवून एअर बस प्रकल्प तिकडे नेल्याचा आनंद मोदींनी साजरा केला आहे. महाराष्ट्राला डिवचण्यासाठीच मोदींनी बडोद्यातील रोड शो काढला,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी घेरले.
‘भाजप खूप मोठी जादूगार’
दरम्यान आदित्य ठाकरेंनी व्यासपीठावरुन मतदारांसमोर काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. ‘सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला महायुतीने पक्षात घेतलं. महिला पत्रकाराला तुझा बलात्कार झाला का? असा प्रश्न विचारणाऱ्यांना तुम्ही तुमचे लाडके भाऊ समजणार का? दीड हजार रुपयांसाठी तुम्ही त्यांना मत देणार का?’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. तर ‘२०१४ मध्ये भाजपा १५ लाख रुपये देणार होती. भाजप खूप मोठी जादूगार आहे, २०१४ मधील १५ लाखांचे आता १५०० झाले. आता डोळे मिठा अन् उघडा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.