पक्ष वाढला नाही, खडसेंऐवजी प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी होती
एकनाथ खडसे हे आपल्या स्वार्थासाठी राष्ट्रवादीमध्ये येत असल्याचे मी शरद पवार यांना सांगितले होते, असे सांगतानाच त्यावेळी मी तुमचे ऐकायला हवे होते, अशी कबुली पवारांनी दिल्याचे सतीश पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याऐवजी एखाद्या होतकरू आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती तर आज जिल्ह्यात पक्षाची ताकद चार पटींनी वाढली असती, शिवाय रावरेसाठी उमेदवार शोधण्याचा जो त्रास झाला तोही झाला नसता, असेही सतीश पाटील म्हणाले.
रोहिणी खडसेंकडे पद ठेवले तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल
एकनाथ खडसे भाजपामध्ये जात असताना रोहिणी खडसे या राष्ट्रवादीमध्येच राहत आहेत. त्यांच्याकडे आपण महिला प्रदेशाध्यक्ष कायम ठेवले तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल, असेही आपण पवारांना सांगितल्याचे सतीश पाटील म्हणाले. रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी तन-मन-धनाने निवडणुकीत काम करावे आणि तसे झाले आणि रिझल्ट दाखविला तरच त्यांचा विधानसभेसाठी विचार करावा, असे पवारांना सुचविल्याचे सतीश पाटील म्हणाले. कारण सुनेच्या उमेदवारीसाठी त्यांनी आपल्याला आजारपणाचे कारण दिले. त्यांची ही खेळी आता उघडी पडल्याचे पाटील म्हणाले.
१० वर्षात जिल्ह्यासाठी काय केले?
भाजपा नेते गिरीश महाजन हे सध्या हवेत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले हे सांगायला पाहिजे. पाच लाखांनी आपला उमेदवार निवडून येईल असे ते ओव्हर कॉन्फिडन्सने सांगत आहेत. याचा अर्थ त्यांनी मतांची काही जुळवाजुळव केली आहे की पाच लाख मतांचा घोटाळा केला आहे ते चार जूनला स्पष्ट होईल. तुमचे एवढी चांगली परिस्थिती होती तर मग सीटिंग खासदार तुम्हाला का सोडून गेले? याचा विचारही त्यांनी करायला पाहिजे, अशी टीका सतीश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.