• Sat. Sep 21st, 2024
आरोपांची तोफ झाडली, पूजा तडस यांना रडू कोसळलं, मायेनं हात फिरवत सुषमा अंधारेंनी गोंजारलं

नागपूर: नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेत्यांना श्रीरामाचे एकवचनी आणि एकपत्नीचे संस्कार द्यावे, म्हणजे अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला ऐकवलं आहे. भाजपचे वर्धा लोकसभेचे उमेदवार असलेले रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी सुषमा अंधारेंसोबत नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पूजा तडस यांनी रामदास तडस आणि पंकज तडस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, मोदींनी मला न्याय द्यावा, २० एप्रिलला जेव्हा ते रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्धेत येतील तेव्हा त्यांनी मला वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.

जे आपल्या परिवाराला सोडून देतात, ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात – सुषमा अंधारे

भाजप उमेदवार यांच्या मुलाशी पूजा तडस यांचा विवाह झाला, कारवाई टाळण्यासाठी त्यांच्या मुलाने हा विवाह केला होता, मोदीजींच्या परिवाराने, मोदींच्या खासदाराचा परिवार सांभाळला का, कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं, मग तिला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं, त्यानंतर तिची अवस्था काय झाली हे कोणीही बघितलं नाही. तो फ्लॅटनंतर विकून टाकण्यात आला आणि या मुलीला बाहेर काढलं, ती रस्त्यावर आली, बाळाला आता दूध द्यायचं तर काय करायचं असा प्रश्न तिच्यासमोर होतं.
बाळाच्या DNA टेस्टसाठी दबाव, रामदास तडसांच्या सुनेची बाळासह पत्रकार परिषद, मोदींकडे दाद
लग्न करुनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात, हे फार भयंकर आहे. देवेंद्र फडणवीसांच्या क्षेत्रात हे सगळं घडावं हे विशेष आहे. ज्या घरात मी त्या मुलीला सुरक्षित ठेवलं आहे, हे रामदास तडस यांनी सांगितंल, ज्या पद्धतीने घर विकलं गेलं, तिला घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते. हा कसला मोदीचा परिवार. ज्या चिमुकल्याला घेऊन ती न्याय मागते आहे तिला न्याय मिळणार काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोदींनी पूजा तडस यांना न्याय द्यावा – सुषमा अंधारे

जर पूजा ताई मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना तिथेच वर्ध्याच्या लोकांसमोर उभं केलं असतं. मोदींच्या परिवारातील ज्यांना तिकीट दिलं ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहेत, त्यामुळे मोदींनी मला २० तारखेला वेळ द्यावा, वर्ध्यात येताना पूजा तडस या लेकीला देखील न्याय द्यावा, इतकी मदत करा, यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या.

भाजपचे असे असंख्य किस्से बाहेर येतील, रिंकी बक्सला आजही न्याय मागते, राहुल शेवाळेंनी कशा प्रकारे तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलं, हे वेगळं सांगायला नको. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागतात.

मोदींनी भाजपच्या लोकांना एकवचनी, एकपत्नीचे संस्कार द्यावे – सुषमा अंधारे

एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार, अनुयायी आपण म्हणत आहात, तर प्रभू श्रीरामाचे एकवचनी, एकपत्नी बाणा, त्यांचे विचार आम्ही स्विकारले असं म्हणणारे भाजपमधल्या लोकांना त्यांनी शिकवायला हवे. कारण एकवचनी, एकपत्नी इतके संस्कार जरी त्यांना शिकवलं तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील. मोदींनी २० एप्रिलला पूजा तडस यांना वेळ द्यावा, ही अपेक्षा करते.

भाकरी फिरवली पाहिजे, नाहीतर ती करपते; सरकारही फिरवलं पाहिजे, नाहीतर जनता करपेल सुषमा अंधारे

पूजा तडस यांना रडू कोसळलं

पत्रकार परिषद संपल्यानंतर पूजा तडस यांना रडू कोसळले, त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा सुषमा अंधारे यांनी त्यांना जवळ घेतलं. पूजा तडस यांच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत त्यांची हिम्मत वाढवली. यावेळी सुषमा अंधारे या देखील भावूक झाल्या होत्या. मदत केल्याबद्दल पूजा तडस यांनी सुषमा अंधारेंचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed