• Mon. Nov 25th, 2024
    भरतशेठ गोगावले हे त्यागमूर्ती, ते लवकरच मंत्री होतील, दानशूर तटकरेंकडून घोषणा

    प्रसाद रानडे, रायगड : मी विश्वासघात केला असे आरोप काहीजण करतात. तुम्ही केलेले एक काम दाखवा आणि विकास गोगावले (भरत गोगावले यांचे पुत्र) यांच्याकडून बक्षीस घेऊन जा. संवेदना मनात असाव्या लागतात, नुसत्या मुठी आवळून किंवा शपथ घ्यायला लावून मते मिळत नाहीत. लोकांवर तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही शपथा घ्यायला लावता, अशा शब्दात रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी माजी खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना लक्ष्य केले. तर भरतशेठ गोगावले हे त्यागमूर्ती आहेत, त्यांचा लवकरच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश होईल, अशी साखरपेरणी तटकरे यांनी करून आगामी काळातील बेरजेच्या राजकारणाची पायाभरणी केली. कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले तटकरे-गोगावले यांच्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ याच्या सुरावटीची रायगडमध्ये खमंग चर्चा होतेय.

    तटकरे यांच्या प्रचाराला सुरूवात

    ऐतिहासिक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत पोलादपूर पितळवाडीतून आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ वाढवला. पोलादपूर येथील श्री भैरी देवीचे आशीर्वाद घेऊन सोमवारी रायगड जिल्ह्यात पोलादपूर येथे तटकरे यांच्या प्रचाराची सुरुवात केली.
    आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, अटीतटीची लढत, एका सुनीलमुळे दुसऱ्या सुनीलचा पराभव झाला होता!

    एनडीए पुन्हा सत्तेत येईल, मोदीच पंतप्रधान होतील

    अनंत गीते फिरायला लागले की समजायचे की निवडणुका लागल्या आहेत. भरतशेठ गोगावले यांनी सहकार्य केले म्हणून त्यांना इथून मताधिक्य मिळाले होते. नाहीतर फक्त निवडणुका आल्या की त्यांना समाज आठवतो, अशा शब्दात तटकरेंनी अनंत गीते यांना ऐकवले.

    देशाला जगाच्या पाठीवर मजबुतीने बघण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ हे नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीत आपण त्यांचे हात बळकट करायचे आहेत. ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल, त्यावेळी एनडीए पुन्हा सत्तेत आलेले दिसेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
    दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका

    मतदारसंघात गोगावले यांचं चांगलं काम, ते लवकरच मंत्री होतील

    या मतदारसंघात काकणभर सरस काम आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. साडेतीन हजार कोटींचा निधी त्यांनी आणला, अशा शब्दात तटकरे यांनी गोगावले यांचे कौतुक केले. या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत. विशेष करून तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी एमआयडीसी आणणे हे गरजेचे आहे. त्यामुळे भारत सरकारच्या माध्यमातून पर्यटनाच्या योजना पोलादपूर तालुक्यात आणल्या जातील, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली.
    हक्काच्या जागा सोडू नका, वर्षावरील बैठकीत शिवसेना आमदारांचा नाराजीचा सूर

    भरतशेठ गोगावले हे त्यागमूर्ती आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार होईल त्यात भरतशेठ गोगावले यांचा शपथविधी होईल, अशी आशा आपल्याला आहे. भविष्यात इथली विकासकामे खासदार म्हणून मी आणि मंत्री म्हणून भरतशेठ गोगावले करतील, याची मला खात्री मला आहे असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

    सैतानाला बाटलीत भरा, वरून बूच लावतो परत तो बाहेर येणार नाही; गितेंचा तटकरेंवर हल्लाबोल

    पोलादपूरने मला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे

    या ऐतिहासिक पोलादपूरमधून भरभरून मतदान व्हावे आणि मतांची टक्केवारी जास्तीत जास्त दिसली पाहिजे, असे आवाहन केले असता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर उभा राहून ५० हजाराचे मताधिक्य देऊ असा शब्द शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी यावेळी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *