• Sat. Sep 21st, 2024

आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

ByMH LIVE NEWS

Apr 8, 2024
आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

मुंबई उपनगर, दि. 8 : मतदानाचा अधिकार हा कोणत्याही लोकशाही समाजातील मुलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे सक्षम लोकशाहीसाठी ‘आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण’… हा नारा घेऊन आशा सेविकांनी घरोघरी मतदान जनजागृती करत लोकशाहीची ही गुढी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. यासाठी यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या मतदानाचा हा पवित्र हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविणे, 18 वर्षावरील नव मतदारांची नोंदणी करणे, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी करून घेणे इत्यादी कामे स्वीपच्यामार्फत हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वीपअंतर्गत आशा सेविका तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना  वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. घरोघरी जनजागृती करतांना मतदार हेल्पलाइन voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि सक्षम Saksham-ECI ॲपच्या माध्यमातून नव मतदारांचे अर्ज भरून घेणे, मतदार यादीत नाव तपासणे किंवा नोंदणी करणे इत्यादी बाबत मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed