• Tue. Nov 26th, 2024

    ‘चुनाव का पर्व देश का गर्व’ लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Apr 8, 2024

    मुंबई दि. ‌8 : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत  मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत राज्यात 5 टप्प्यात मतदान होत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार असून, या  चार मतदारसंघात 73 लाख 28 हजार 865 मतदार आहेत.

    मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे यासाठी सचिन तेंडुलकर यानी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

    ‘चुनाव का पर्व देश का गर्व’ म्हणत सचिन तेंडुलकर याने सांगितले आहे की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रतीक्षा कक्ष, शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग  आणि 80 वर्षांवरील मतदारांसाठी व्हील चेअर, मदतनीस आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करावी. नवमतदार 24 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या अथवा वोटर हेल्प लाईन, मोबाईल हेल्प लाईनचा वापर करावा.

    मुंबई उपनगर क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चारही मतदार संघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी विविध उपक्रम राबवित आहेत.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed