मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ अखेर संपला असून दोन आठवड्याच्या काथ्याकुटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. शशिकांत शिंदे हे १५ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दुसरीकडे महायुतीकडून उदयनराजे भोसले हे लोकसभा लढविणार हे अंतिम असले तरी त्यांच्या नावाची घोषणा अद्याप भाजपकडून केली गेली नाही. मात्र त्यांच्याकडून मतदारसंघात प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्याची लढाई राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी होईल.साताऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार असल्याने महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीसमोर उमेदवारी कुणाला द्यायची हा मोठा पेच होता. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने तसेच सत्यजित पाटणकर यांची नावे गेली १५ दिवस चर्चेत होती. दरम्यानच्या काळात श्रीनिवास पाटील यांना पक्षाने फेरविचार करण्याची विनंती केली. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला सक्रीय राजकारणात राहून पदाला न्याय देणे जिकिरीचे होईल, असे सांगून निवडणूक लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
या वयात साहेब लढतायेत, तुम्हीही लढले पाहिजे, पदाधिकाऱ्यांचा आग्रह, माघार घेतलेले श्रीनिवास पाटील पुन्हा लढणार?शशिकांत शिंदे यांना कामाची पोचपावती
माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात विशेष करून जावळी आणि कोरेगावमध्ये मोठी ताकद आहे. याआधी त्यांनी विधानसभेत काम केले आहे. सध्या ते विधान परिषदेवर आहेत. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. परंतु पराभवानंतरही ते पक्षात अधिक सक्रीय होऊन काम करू लागले. अगदी राष्ट्रवादीत बंड झाल्यावरही त्यांनी शरद पवार यांची साथ न सोडता त्यांच्या खांद्याला खांदा लावून साताऱ्यात काम सुरूच ठेवले. त्याच कामाची पोचपावती त्यांना शरद पवारांनी दिल्याची साताऱ्यात चर्चा आहे.
बच्चा समज के छोड दिया असं विरोधक म्हणत असतील, मी आता बच्चा राहिलो नाही | उदयनराजे
शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा
दिल्लीत जाऊन उमेदवारी निश्चित करून आलेले उदयनराजे भोसले अद्यापही अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आलेले नाहीत. मात्र असे असले तरी महायुतीकडून साताऱ्यात प्रचार सुरू झालेला आहे. महायुतीचा पहिला मेळावा कराडमध्ये तर दुसरा मेळावा वाईमध्ये पार पडला. यावेळी शिवेंद्रराजेंनी आपल्या भाषणातून उदयनराजेंच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी कडवी टक्कर पाहायला मिळेल.